सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : महापालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच, नागरीकांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशातच कचरा टाकण्याचा प्रकार केला जात असल्याचे संतापजनक प्रकार समोर आले आहेत. त्यातच नव्याने बसविण्यात आलेल्या या निर्माल्य कलशाचे दरवाजे चक्क तोडण्यात आल्याचे आढळून आले आहे.
नागरीकांकडून धार्मिक विधी, पुजा आदी केल्यानंतर निर्माण होणारे निर्माल्य हे नदीत टाकले जाते. यामुळे नदीच्या पाण्याच्या प्रदूषणात भर पडत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील विविध घाट, नदीवरील पुलांच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. परंतु या कलशांत निर्माल्य कमी आणि इतर स्वरुपाचा कचरा अधिक टाकला जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये घरातील कचऱ्यापासून, प्लॅस्टीकच्या पिशव्या ते सॅनिटरी नॅपकिनपर्यंतचा कचरा आढळून येत आहे. काही ठिकाणी कलशांएैवजी तेथेच आजूबाजूला निर्माल्य आणि त्याच्या बरोबरच इतर कचराही टाकून परिसर घाण केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
एकीकडे महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. तरीही नागरीकांकडून प्रशासनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कचऱ्याचे वर्गीकरण न करता कचरा देणे, मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या पिशव्या टाकून देणे, घरातील टाकाऊ वस्तु रस्त्यावर फेकून देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्याचवेळी धार्मिक भावना जोडल्या असलेल्या निर्माल्याबाबतही नागरीक सजग नसल्याचे स्पष्ट होत आहे. एका बाजूला पुण्याच्या अस्वच्छतेबाबत ओरड करताना महापालिकेच्या कामाबद्दल नागरिक ओरड करतात, तर दुसऱ्या बाजूला नागरिकच शिस्त पाळत नाहीत. या वृत्तीला काय म्हणायचे!
पंचवीस ठिकाणी ५० निर्माल्य कलश
निर्माल्य संकलन करण्यासाठी महापालिकेने सिद्धेश्वर वृद्धेश्वर, पुलाची वाडी, पांचाळेश्वर, एस. एम. जोशी घाट, आदी प्रमुख घाटांसह विविध पुलांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. यासाठी कलशांची नव्याने खरेदी केली गेली. परंतु नागरीकांच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्षात निर्माल्य संकलन करण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
खत निर्मितीसाठी होतो उपयोग
निर्माल्यातील हार, फुले, दुर्वा, केळीची पाने, फळे इतर पूजा साहित्य संकलन आणि वर्गीकरण करून त्यापासून खत निर्मिती करण्यात येते. या खताचा वृक्ष, रोपे वाढीसाठी वापर करण्यात येतो. पर्यावरणाला पूरक असलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश बाजूला राहिल्याचे प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळाले.
नागरीकांनी निर्माल्य कलशात टाकणे अपेक्षित आहे. या कलशांना दरवाजे बसविले आहेत, ते तोडण्यात आले असावेत, याबाबत चौकशी केली जाईल. तसेच जनजागृती केली जाईल.
– संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका