मुंबई : राज्यात असे अनेक शिक्षक आहेत ज्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. ते सर्व नोकरीच्या प्रतिक्षेतच असतानाच आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात 24 ऑक्टोबरपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
शिक्षक भरतीबाबत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी 11 ते 21 ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी 21 ते 24 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकारे दखल घेत स्थगिती दिली होती.
दरम्यान, न्यायालयाने ही स्थगिती उठविली असून, शिक्षक भरती सुरू झाली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.