पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ. अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ. विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले आहे.
ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर डॉ. भामरे यांच्याजागी सप्टेंबरमध्ये प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ दूर करीत सुसूत्रता आणली होती. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी वक्तशीरपणा आणि शिस्तीचे पाऊल उचलले होते. याबद्दलही अनेक जण त्यांच्यावर नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डॉ. अजय तावरे हे आधी अधीक्षकपदी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी तावरे यांची मागील वर्षी एप्रिलमध्ये या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची या प्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात आली होती. याचबरोबर डॉ. तावरे हे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे एक पूर्णवेळ जबाबदारी असताना वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आता देण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे दोन पूर्णवेळ जबाबदाऱ्या सोपविणे चुकीचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.