वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप (संग्रहित फोटो)
सोलापूर : सोलापूरच्या बाबासाहेब जगजीवन राम झोपडपट्टीत, दूषित पाण्याच्या संशयामुळे दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका मुलींची प्रकृती गंभीर आहे. पीडित कुटुंबांनी आरोप केला की, त्यांच्या घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्या. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता सोलापूरकर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
सोलापूरकरांनी पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वास्तविक, सोलापूरला सतत पाणी दूषित होण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. दोन मुलींच्या मृत्यूमुळे आता सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाग्यश्री म्हेत्रे (वय 16) आणि जिया म्हेत्रे (वय 16) असे या मृत मुलींची नावे आहेत.
सोलापूरमध्ये होणारे दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्या आजारी पडल्या असल्याचा आरोप केला जात आहे. तर जयश्री महादेव म्हेत्रे (वय 18) ही मुलगी सध्या गंभीर असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत आयुक्तांचे आश्वासन
या झोपडपट्टीमध्ये मागील काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महानगरपालिकेच्या याच हलगर्जीपणामुळे या मुलींचा मृत्यू झाला असल्याचा आरोप देखील आता केला जात आहे. त्यामुळे आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे आश्वासन महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहे. संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करून यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.