कल्याण: कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या भरारी पथकाने एका टेम्पोमधून दोन टन प्लास्टिकच्या पिशव्या जप्त (Two Tonnes Plastic Bags Seized) केल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लास्टिकची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.
[read_also content=”हळुवार फुलणाऱ्या प्रेमकथेचा अनुभव, ‘असा ये ना..’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/photos/asa-ye-na-song-released-on-social-media-nrsr-359921.html”]
काल रात्रीच्या सुमारास महापालिकेच्या भरारी पथकाची खडकपाडा परिसरात गस्त सुरू होती. त्याचवेळी तिथे एक संशयित टेम्पो या पथकाच्या नजरेस पडला. त्यांनी टेम्पो थांबवत टेम्पोमध्ये झडती घेतली. झडतीमध्ये या टेम्पोमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या असलेल्या तब्बल 35 गोण्या म्हणजेच एकूण दोन टन प्लास्टिक सापडले. महापालिकेच्या भरारी पथकाने या टेम्पोला ताब्यात घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. सध्या या प्लास्टीकची तपासणी करून हे प्रतिबंधित प्लास्टिक आहे का ? या संबंधी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतली जात आहे. टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले असून त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्लास्टिक कुठून आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याचा देखील शोध घेतला जात आहे.