सौजन्य - सोशल मिडीया
सातारा/आनंद कदम : सातारा नगरपालिकेतील सत्तेची गणिते अत्यंत गोपनीयरित्या जुळवली जात आहेत. कार्यकर्त्यांच्या महत्त्वकांक्षा आणि आरक्षणाला धरून परिस्थिती सापेक्ष करावी लागणारी राजकीय समीकरणांची जुळवा जुळव या दृष्टीने दोन्ही राजेंनी सत्तेचा अलिखित फॉर्मुला ठरवल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानुसार सातारा विकास आघाडी ३० जागा व नगर विकास आघाडी २० जागा असे सत्तासूत्र समोर येत असल्याचे काही विश्वसनीय सूत्रे ठामपणे सांगू लागली आहेत.
नगराध्यक्ष पद उदयनराजे गटाकडे तर उपनगराध्यक्ष पद शिवेंद्रसिंहराजे गटाकडे अशा चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याबाबत कोणत्याही सूत्राने दुजोरा दिला नसला तरी छुप्या चर्चांनी मात्र जोर धरला आहे. सातारा नगरपालिकेच्या सत्ता सूत्रांची २०१९ मध्ये सातारा विकास आघाडी २० जागा, नगरविकास आघाडी १२ जागा तर भाजपचे ६ निष्ठावंत नगरसेवक निवडून आले होते. तत्कालीन परिस्थितीनुसार २०१९ नंतर खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर साताऱ्यात भाजपचे तगडे आव्हान निर्माण झाले.
२०२५ च्या सातारा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष भाजपचा असावा आणि ही निवडणूक कमळ चिन्हावर लढली जावी, अशा स्पष्ट सूचना पक्षश्रेष्ठींकडून आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांना महाराष्ट्राचे कॅप्टन यापूर्वी जाहीर केले आहे, तर फलटण येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनानंतर देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात कमरा बंद चर्चा झाली होती. त्यामध्ये साताऱ्यात जास्तीत जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आले पाहिजेत आणि नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, अशी जबाबदारी फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सोपवल्याची चर्चा आहे.
दोन्ही राजे आता अॅक्टिव्ह मोडवर
साताऱ्याच्या सत्ता सूत्राच्या संदर्भाने महत्वपूर्ण राजकीय समीकरणांसाठी दोन्ही राजे आता अॅक्टिव्ह मोडवर आले असून नगराध्यक्ष भाजपाचाच होणार असला तरी तो कोणत्या गटाचा असावा यावर चर्चा सुरू झाली आहे. नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांच्या महत्त्वकांक्षांना धुमारे फुटले आहेत. मात्र सातारा जिल्ह्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भाजपचे हेवी वेट नेते समजले जातात. सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक अशा संस्थात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आहे. सातारा व जावली तालुक्यातही त्यांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे. त्या दृष्टीने खासदार उदयनराजे भोसले यांचे सातारा नगरपालिकेतील वर्चस्व एक हाती आहे.
इलेक्टिव्ह मेरिटच्या उमेदवाराचा शोध
राजकीय समीकरणे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे यांनी राजकीय समीकरण एकहाती फिरवली होती. राजघराण्यातील स्त्रीच्या विरोधात त्यांनी सर्वसामान्य स्त्री उभी करून राजकीय डाव उलटवून लावला होता. दोन्ही नेत्यांमध्ये संघर्षाचे मूळ हेच कारण होते. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे जुळवून घेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी राजकीय बांधिलकी कायम ठेवत पुन्हा मनोमिलनाचे पोषक वातावरण तयार केले आहे. नेते मनोमिलनाची भाषा न वापरता त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडे सोपवत वेट अँड वॉचची भूमिका घेत असल्याचे सांगत आहेत. मात्र साताऱ्यात पडद्यामागून राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, काम करणाऱ्या इलेक्टिव्ह मेरिटच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे.
कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीच्या मूडमध्ये
मनोमिलनाचा सस्पेन्स कायम असला तरी कार्यकर्ते मैत्रीपूर्ण लढतीच्या मूडमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यावरूनच एका बाजूला शिवेंद्रसिंहराजे यांचे राजकीय वर्चस्व आणि दुसरीकडे सातारा नगरपालिकेतील खासदार उदयनराजे भोसले यांची राजकीय कुशलता यांचा समन्वय साधायचा असेल तर थोडे झुकते माप उदयनराजे गटाला आणि शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटाकडे सहकार्याची भूमिका अशा पद्धतीत सत्ता समीकरण जुळवण्यात आले आहे. सत्ता समीकरणाचे हे विषय अद्यापही गुलदस्त्यात आहेत.






