Photo Credit- Social Media शेतकऱ्यांना कर्जमाफी आश्वासन दिले नाही
कराड / राजेंद्र मोहिते : तब्बल 35 वर्षे निष्ठेने कराड दक्षिणचा बालेकिल्ला राखणाऱ्या दिवंगत नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी शरद पवारांच्या घड्याळाला सातत्याने हात दाखवला. परंतु, काकांच्या नंतर कालानुरूप दक्षिण मांडेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. तसेच बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काकांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अखेर आपल्या हातात शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
कराड दक्षिणचे राजकारण करताना संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आपला वचक ठेवणारे दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी राजकारण करतानाच रयत संघटनेची मोट बांधली. 2014 मध्ये काकांनी याच संघटनेच्या माध्यमातून अपक्ष लढविलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत संघटनेच्याच माध्यमातून लढलेल्या अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनाही अपयश आले.
काँग्रेसच्या चिन्हाशिवाय लढलेल्या या दोन्ही निवडणुकांत रयत संघटनेचा कस दिसून आला. काकांच्या राजकीय उत्तरार्धात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी, तर त्यांच्या पश्चात अनेक शिलेदारांनी संघटनेचे साथ सोडली. त्यामुळे संघटनेचा दक्षिणेतील राजकीय धबधबा काहीसा कमी झाल्याचे अनेक निवडणुकांमधून दिसून आले. यातच बदलत्या राजकीय समीकरणांनुसार वाटचाल करण्यासाठी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे रयत संघटनेची वेळ आता बदलणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत ते अगदी सोसायट्यांपर्यंत कार्यकर्त्यांना निश्चितच बळ मिळणार आहे, यात शंका नाही.
शनिवारी (दि.19) राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रयत संघटनेच्या सुमारे दहा हजार कार्यकर्त्यांसह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याकडे रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दक्षिणेतील मतदार, नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागणार कस
अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह कराड व मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये रयत संघटनेसह अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर त्यांच्या नवनिर्मित अजित पवार राष्ट्रवादी गटाचा कस लागणार आहे. या निवडणुकांमध्ये त्यांना कितपत यश येईल, यांवरून त्यांची विधानसभेची वाटचाल ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
संस्थांना मिळणार बळकटी
उंडाळकर यांच्या ताब्यात असलेल्या सध्याच्या कराड शेती उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघासह कोयना बँक, शामराव पाटील पतसंस्था, कोयना दुध संघ, ग्रामीण शिक्षण संस्था आदी संस्थांनाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे बळकटी मिळणार असल्याची चर्चा आहे.
नव्या कार्यकर्त्यांची बांधावी लागणार मोट
विलासकाकांनी कराड दक्षिणमधील गावागावासह खेडोपाडी, वाडी, वस्त्यांवर फिरून रयत संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोट बांधली. यातील काही कट्टर कार्यकर्त्यांनी अखेरपर्यंत त्यांची साथ सोडली नाही. त्यानंतर ही संघटना राखून ठेवण्यात अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना काहीअंशी अपयश आल्याचे बोलले गेले. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार आगामी राजकीय वाटचालीला दिशा देण्यासाठी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनाही अवघा दक्षिण पिंजून काढत नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.