एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे पेणमध्ये निदर्शने
विजय मोकल, पेण: एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. मात्र या भाडेवाढीनंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशातच आता एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटीच्या भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान “प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी बस) तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय झाला. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. यामुळे लालपरीचा प्रवास महागला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या भाववाढी संदर्भात माहीत नसल्याचे सांगत आहेत. हे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री पदाचा वाद, पालकमंत्री पदाचा वाद चालू आहे. निवडणूकीपूर्वी लाडकी बहीण व इतर योजनांची प्रलोभने दाखवून निवडून आले आहेत. त्या योजनांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीत जो खळखळाट झाला आहे, तो भरून काढण्यासाठी ही भाव वाढ करण्यात आली आहे. हे महाविस्कळीत सरकार असून परिवहन महामंडळाकडून (ST bus) तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे त्याचा निषेध करतो.” असे वक्तव्य प्रसाद भोईर यांनी रामवाडी येथे एसटी दरवाढ विरोधात निदर्शने करताना केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एसटीकडून अचानक झालेल्या भाडेवाढ संदर्भात पेण रामवाडी येथे निदर्शने करण्यात आली. पेण रामवाडी बस डेपोतून सुटणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांना थांबवून घोषणाबाजी करण्यात आल्या. एसटी विभागाकडून झालेल्या दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन देखील एसटीचे जिल्हा नियंत्रक दीपक घोडे यांना देण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, नरेश गावंड, लहुशेठ पाटील, जगदीश ठाकूर, समीर म्हात्रे, हिराजी चोगले, योगेश पाटील, अच्युत पाटील, नरेश सोनवणे, तुकाराम म्हात्रे, शिवाजी म्हात्रे, राकेश मोकल, चेतन मोकल, गजानन मोकल, विजय पाटील, सुहास पाटील, नंदू मोकल, नटराज म्हात्रे, नामदेव पिंगळसकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील जीवनवाहिणी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे आणि बोरिवली प्रवासाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचे प्रवासी तिकिटासाठी आधी ५४० रुपयांवरून ६२४ रुपये झालं आहे. तर रत्नागिरी बोरिवलीच्या तिकिटासाठी ५५० रुपये मोजावे लागत होते. ते आता ६३४ रुपये मोजावे लागणार आहेत.