मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे उठाव म्हणून शिवसेनेचे बंड आणि आता अजित पवारांचे राष्ट्रवादीतील बंड होय. अजित पवारांनी बंड करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित पवारांनी शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अजित पवारांना भेटले.
उद्धव ठाकेर थेट अजित पवारांच्या दालनात
विरोधकांचा चेहरा असलेले उद्धव ठाकरे हे थेट अजित पवारांच्या दालनात जाऊन भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांसोबत घेतलेल्या या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल खुद्द उद्धव ठाकरेंनी खुलासा केला आहे.
भेटीनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि परवा बंगळुरु येथे देशप्रेमी पक्षांची बैठक पार पडली. जी लोकशाही प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली आहे. ही लढाई व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नसून हुकूमशाही विरोधात आहे. पण, जो पायंडा पडतो आहे ते देशासाठी घातक आहे, त्यासाठी सर्व लोकशाहीप्रेमी पक्ष एकत्र येत आघाडी मजबूत निर्माण झाली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
नेमकी चर्चा काय झाली पाहा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विधीमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी याबद्दल माहिती दिली. उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांने राज्यासाठी चांगले काम करावे, असे सांगितले. येथे सत्तेसाठी मोठ्या विचित्र घडामोडी आणि घाणेरडे राजकारण चालू असताना, त्यामध्ये राज्याचे तसेच मूळ शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अजित पवारांसोबत अडीच वर्ष केले काम
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. इथे बाकीच्यांचे सत्तेसाठी काहीही डावपेच चालले असले तरी त्यांच्याकडून जनतेला योग्य मदत मिळेल. कारण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या परत एकदा त्यांच्याकडे दिल्या गेल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.






