उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग (फोटो- टीम नवराष्ट्र)
इंदापूर: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात तब्बल १ लाख क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार हा विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी जारी केलेल्या सूचनेत नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, जनावरे व साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच सखल भागातील रहिवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरण परिसरासह बारामती, इंदापूर, दौंड, पंढरपूर या भागातील ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पुढील काही तासांत पावसाचं ‘महावादळ’
रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात पुढील काही तासांत व् उद्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
सचेतच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेच्या पूर्व सूचना देण्यात येत असून भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. तर टाकळी येथे भीमा नदी इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने स्थानिक पथके तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.