शेलूबाजार : महाराष्ट्रातील शहरी भागातील सर्व बचत गटांचे मासिक पाळी जनजागृती सत्र घेण्याची संधी क्षितीज सामाजिक संस्थेला मिळाली आहे. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल चौधरी कदम यांनी ही माहिती दिली. शेलूबाजार येथील क्षितिज सामाजिक संस्था गेल्या सात वर्षापासून मासिक पाळी जनजागृतीवर कार्यरत आहे. ब्लेड द सायलेन्स या चळवळीची सुरुवात करून जवळ जवळ साठ हजाराहून अधिक महिला मुली तरुणांपर्यंत ही चळवळ टीमच्या मदतीने पोहोचली आहे. क्षितीज संस्थेच्या या कार्याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय मासिक पाळी दिवस २८ मे ला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाचे एनयूएलएम युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील शहरी भागातील सर्व बचत गटांचे मासिक पाळी जनजागृती सत्र घेण्यासाठी क्षितिज सामाजिक संस्थेची निवड झाली आहे. पुणे, कोकण, नाशिक, अमरावती औरंगाबाद अशा सर्व विभागांमधून सहा हजारांहून अधिक महिलांसोबत मासिक पाळी स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तसेच शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बुलडाणा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने क्षितिज संस्थेने २८ मे रोजी बुलडाणा येथे मासिक पाळी उत्सवाचे आयोजन केले आहे. सर्वांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन क्षितीज संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल चौधरी कदम यांनी केले आहे.