फलटण : गेली अनेक वर्ष हक्काच्या पाण्यापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील दुष्काळी भागात पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही. पाणी योजना पूर्ण करुन शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचल्याने नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहील. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करुन शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्याबरोबरच दुष्काळी भाग म्हणून असलेला ठसा पुसण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करील, यासाठी आवश्यक असेल तितका निधी दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे दिले.
फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर वचनपूर्ती जाहीरसभा व निरा देवधर-धोम बलकवडी जोड कालवा शुभारंभ, नाईकबोमवाडी एमआयडिसी भूमीपूजन व विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या लाभाचे वाटप उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जनतेने पाण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला, दुष्काळी भागात पाणी यावे म्हणून निरा देवधर उजव्या कालव्याला मान्यता मिळाली. त्यासाठी प्रारंभी ६१ कोटी मंजूर करण्यात आले होते. तथापि ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ९७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. निरा देवधर जोड कालवा प्रकल्प हा देशातील पहिला प्रकल्प असून, यामुळे ६ ते ७ लाख नागरिकांना याचा फायदा होऊन ४ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल.
या योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी बंदिस्त पाईपलाइनद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पाण्याचा थेंब आणि थेंब वाचणार असून, १६ टीएमसी पाण्याचे योग्य रितीने वाटप करता येणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दुष्काळी भागांना पाणी मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बळीराजा योजना सुरु केली आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्राला गेल्या १३ महिन्यात ८ मोठे प्रकल्प मंजूर झाले असून, यासाठी २२ हजार कोटीच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.