पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात जून महिन्याच्या 'या' तारखेपासून मान्सून सक्रिय होणार (सौजन्य : iStock)
बुलडाणा : मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असतानाही बुलढाणा जिल्ह्यात कालापासून दिवसभर ढगाळ वातावरण होते. सोमवारी सायंकाळी लोणार, सिंदखेडराजा, चिखली तसेच बुलढाणा तालुक्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे लोणार तालुक्यात पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होत आहे. लोणार चिखली, सिंदखेड राजा तालुक्यातही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी अचानक काळेभोर ढग दाटून आले, काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. यामुळे गहू, कांदा, भाजीपाला सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीची बदल जाणवत आहे. एकीकडे, राज्यात उन्हाचा चांगलाच तडाखा बसत आहे. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत असल्याने तापमानातही मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पाच दिवस राहणार पाऊस
ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमानवाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत, त्यामुळे पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
हवामान विभागाने जारी केला हवामानाचा अंदाज
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातही हलक्या पावसासह गडगडाट अपेक्षित आहे. विदर्भात चंद्रपूर, गडचिरोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता आहे.