संग्रहित फोटो
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील आडोळ खुर्द गावासाठी रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी झालेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार तब्बल 31 तासांनंतर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृतदेह मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर नदीपात्रातून सापडला असून, शासनाच्या निष्क्रियतेमुळे हा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गौलखेड येथे पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बुलढाण्याच्या जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांचा जलसमाधी आंदोलनात मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजय बुरुंगले, स्वातीताई वाकेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की स्वातंत्र्यदिनी आपल्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना एखाद्या शेतकऱ्याचा जीव जावा, ही आपल्या लोकशाहीला कलंक लावणारी बाब असून शासन-प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे निदर्शक आहे. या दुर्देवी घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन हलगर्जीपणा बद्दल माफी मागितली पाहिजे होती व ते मुजोरी दाखवत आहेत.
सततच्या संघर्षानंतरही शेतकरी व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही. एखाद्या शेतकऱ्याला आपला जीव देऊन मागण्या मांडाव्या लागतात, हे कोणत्याही जबाबदार शासनासाठी लज्जास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी तसेच पवार यांच्या कुटुंबियांना भरघोस मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
घटनेमुळे परिसरात शोककळा
15 ऑगस्ट रोजी, जिगाव प्रकल्पानजीक आडोळ खुर्द येथे गावकऱ्यांनी पुनर्वसन आणि रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासनाविरुद्ध प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केले होते. आडोळ खुर्द गावाचा जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात समावेश असूनही, गावकऱ्यांना अद्याप जमीन आणि योग्य मोबदल्याचा प्रश्न सुटलेला नाही. या आंदोलनादरम्यान विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी घेतली, परंतु नदीचा वेगवान प्रवाह आणि दुथडी भरलेले पाणी यामुळे ते वाहून गेले. या घटनेने गावकरी, पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा येथील शोध आणि बचाव पथक तातडीने आडोळ खुर्द येथे रवाना झाले. शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, परंतु अंधारामुळे ती थांबवावी लागली. शनिवारी सकाळी अकोला आणि नांदुरा येथील पथकांनी पुन्हा शोध सुरू केला. अखेर सामूहिक प्रयत्नांनंतर पवार यांचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.