आषाढी वारीनिमित पंढरपूर सजले (फोटो- टीम नवराष्ट्र)
Follow Us:
Follow Us:
पंढरपूर: आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सोहळ्याला सुरवात झाली असून, मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. मंदिर परिसर व दर्शनरांग गजबजली आहे. आषाढी सोहळ्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंडया श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, श्री.संत तुकाराम भवन व श्री.संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी व आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभा-यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने, भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. रात्रीची ही दृष्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत. संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे. मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
सदरची विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती व शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नांनंतर करण्यात आली असून, याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे. यासाठी एलईडी माळा, लटकन, तोरणे, रोप लाईट, आर्टीकल, व्हाईट व वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने देखील अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आलेल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने विठूरायाची नगरी लखलखली असून, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे, माय-बाप विठूरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगीतले.
फडणवीसांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण
आषाढी शुध्द एकादशी रविवार दि. 06 जुलै, 2025 रोजी आहे. या दिवशी पहाटे मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येणार असून, महापूजेचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आज दिनांक 17 जून रोजी वर्षा निवासस्थान, मुंबई येथे मंदिर समितीकडून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
Web Title: Very beautiful decoration in shri vitthal rukmini temple pandharpur for ashadhi wari