नवी मुंबई : वर्षभरापूर्वी नवी मुंबई गुन्हे शाखेने कुख्यात संघटित गुन्हेगार विकी देशमुख याला गोव्यामधून अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने पुढील अनेक दिवस त्याच्या साथीदारांची पोलिसांकडून धरपकड सुरू केली होती. त्यामध्ये आतापर्यंत देशमुख टोळीच्या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. राकेश जनार्दन कोळी हा १७ वा आरोपी आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा अमित काळे, यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली मोक्का गुन्हयातील फरार आरोपीतांचा शोध घेण्याची मोहिम राबविण्यात आलेली होती.
राकेश कोळी याच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम ३०२, १२०(ब), २०१, २१२, ३६४, ३४ सह आर्म ऍक्ट कलम ३, २५, २७ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), १३५, सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(1), ३(२), ३(३), ३ (४). या खुन खटल्यातील अटक असलेला कुख्यात गुन्हेगार विक्रांत देशमुख याच्या संघटीत गुन्हेगारी टोळीतील ४ वर्षे फरार असलेल्या आरोपीस सहाय्यक निरीक्षक देवडे, उपनिरीक्षक देसाई व गुन्हे शाखेकडील पथकाला माहिती मिळाली होती की राकेश जनार्दन कोळी हा उलवे येथील गव्हाणगाव येथे येणार आहे. सदर परिसरात सापळा रचुन राकेश जनार्दन कोळी वय-३१ वर्षे याला ताब्यात घेऊन जेरबंद करुन विक्रांत देशमुख याचे गुन्हेगार टोळीच्या गुन्हे शाखा, नवी मुंबई पोलीसांकडून मुसक्या आवळल्या आहेत.
राकेश कोळी हा विक्की देशमुखचा उजवा हात म्हणून ओळखला जात असून तो पोलिसांना चकमा देण्यासाठी वेशांतर करून राज्यभर फिरत होता. सन २०१९ पासून पोलीस याचा तपास घेत होते. अटक आरोपी राकेश जनार्दन कोळी याला पोलीस कोठडी मिळाली आहे. राकेश जनार्दन कोळी याच्यावर राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्यावर नेमके कुठे व किती गुन्हे दाखल आहेत याचा तपास पोलीस घेत आहेत. पोलिसांनी विकी देशमुख यांच्या १६ साथीदारांना आतापर्यत पकडले असून राकेश जनार्दन कोळी हा १७ वा आरोपी आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा पोलीस पथक विक्रांत देशमुख याचे टोळीतील इतर फरार आरोपीतांचा शोध घेत आहेत.