सोलापूर : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आता शेजारील राज्य आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता शेजारील तेलंगाणाचे केसीआर यांनी आपली पाळेमुळे महाराष्ट्रात रुजवण्याकरिता जोरदार तयारी केली आहे.
के. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर :
बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आषाढी वारीनिमित्त असलेल्या दौऱ्यासाठी केसीआर तेलंगणातून ६०० गाड्यांचा ताफा घेऊन आले आहेत.
महाराष्ट्रात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे आगमन होण्यापुर्वी पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी मटणाचे बेत आखल्या जात आहेत. बॅनर वर पांडुरंगाचे फोटो तर मटणावर ताव हाणून पंढरीत आगमन ? @TelanganaCMO पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करू नका.🙏🏼😔 pic.twitter.com/4kcoKMjiqo — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 26, 2023
बीआरएसच्या नेते मंडळींना खास मटणाचा बेत :
आज धाराशिव येथे केसीआर यांना आणि त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळींना खास मटणाचा बेत ठेवण्यात आलेला आहे. धाराशिव येथील मुरुम येथे त्यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळ आणि नेतेमंडळी अशा साधारण दीड हजार जणांसाठी उस्मानाबादी बोकडाच्या मटणाची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय आवडीनुसार चिकनदेखील ठेवण्यात आलेले आहे.
उद्या केसीआर हे आपल्या नेत्यांसाठी पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार होती. मात्र, राज्य शासनाने ही परवानगी नाकारली आहे. उद्या एकादशी असूनही आज त्यांनी मटणाचा बेत आखल्याने चर्चा होऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी ट्विट करीत उडवली मजा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करुन बॅनरवर पांडूरंगाचे फोटो आणि पैशाच्या जोरावर ठिकठिकाणी बटणाचा बेत, असे म्हणत पंढरीची वारी पवित्र आहे ती अपवित्र करु नका, असं आवाहन केलंय.
600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर हे सोलापुरात दाखल
दरम्यान, सहाशे गाड्यांचा ताफा घेऊन केसीआर हे सोलापुरात दाखल झालेले आहेत. आज दिवसभर ते धाराशिव येथे असून उद्या पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घेतील. त्यानंतर ते तुळजापूर येथेही तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतील. आज त्यांचा सोलापुरात मुक्काम आहे.






