शाळेसाठी जीवघेणा प्रवास! यशोदा नदीच्या पुरात ३ विद्यार्थी अडकले
राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यातच वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
डिगडोह येथे सध्या यशोदा नदीवर पूल बांधकाम सुरू असून त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला होता. याच मार्गाने नागझरी येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन मित्र शाळेतून परत येत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. आणि ते तिघेही पुराच्या पाण्यात अडकले. फायर ब्रिगेड आणि जिल्हा शोध व बचाव पथकाच्या मदतीने शर्थीचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. अखेर तिन्ही विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं असून सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
दरम्यान, विदर्भात अन्यत्रही मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून विशेषतः मेहकर तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कास नदीला आलेल्या पुरामुळे मादणी आणि आरेगाव या गावांचा वाशिम जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
वाशिम जिल्ह्यात मागील २० तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. नागपूर-संभाजीनगर महामार्गावरील पिंप्री सरहद गावाजवळ उतावळी नदीवर पाण्याचा जोर वाढल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. अनेक वाहनचालकांना तासनतास थांबून रहावं लागत आहे.
कोयना धरणातील पाणीसाठ्यात होतीये वाढ; पाणीसाठा पोहोचला 43.99 टीएमसीवर
नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पैनगंगा नदीची पातळी वाढली आहे. परिणामी सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रवाह कमी झाला होता. मात्र कालच्या पावसामुळे धबधबा पुन्हा ओसंडून वाहत आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम असून प्रशासन सतर्क आहे. पुरामुळे अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून विविध भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे.