कोयना धरणातील पाणीसाठ्यात होतीये वाढ; पाणीसाठा पोहोचला 43.99 टीएमसीवर (फोटो-सोशल मीडिया)
पाटण : कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. तरी धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद धरणात १८ हजार ६३४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
धरणात सध्याच्या घडीला ४३.९९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी २६ जून रोजी धरणात अवघा १६.६९ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीपेक्षा या वर्षी २७.३० टीएमसी जादा पाणीसाठा कोयना धरणात झाला आहे. सध्या धरणाच्या उजव्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी पूर्वेकडे नदी पात्रात सोडण्यात येत आहे. यावर्षी वेळेआधीच मे महिन्यातच धुवाधार पावसाने सुरूवात केल्याने तालुक्यातील साखरी चिटेघरसह इतर छोटी, छोटी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत.
याशिवाय महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाच्या पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कोयना धरणातील सध्याचा पाणीसाठा पाहता गतवर्षीपेक्षा तो दुप्पट आहे. अद्यापही पावसाचे दोन ते तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी धरणातील ज्यादा पाणीसाठा पाहता व भविष्यातील पडणारा पाऊस लक्षात घेता धरण व्यवस्थापनाला आतापासून धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. पावसाचे पाणी आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे पाटण शहरासह अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी
सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणात सरासरी प्रतिसेकंद १८ हजार ६३४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणात एकूण उपलब्ध ४३.९९ तर ३८.९९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातील पाणी उंची समुद्र सपाटीपासून २१००.०४ फूट तर जलपातळी ६४०.१८२ मीटर इतकी झाली. बुधवारी सकाळी ८ ते गुरुवारी सकाळी ८ या २४ तासात व एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे ७९ मिलिमीटर (११४१), नवजा ३१ मिलिमीटर (१०७०) तर महाबळेश्वर ९२ (११३०) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.