वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी बस; तब्बल 5000 गाड्यांचे एसटी महामंडळाचे नियोजन (फोटो सौजन्य-X)
पंढरपूर : पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशीचा सोहळा पुढील 6 जुलैला रंगणार आहे. प्रशासनाच्या वतीने वारीच्या नियोजनासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. बुधवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे पंढरपुरात आले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यभरातील वारकऱ्यांना पंढरीत येता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार हजार 700 बसगाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यंदाच्या आषाढी वारीसाठी अंदाजे 15 लाख भाविक येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. वारीच्या निमित्ताने पंढरीत 15 हजारांहून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय ड्रोनद्वारे देखील गर्दीवर नियंत्रणाचे नियोजन आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपासून पंढरीत आषाढी एकादशी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी दिली जाते. यंदाही त्याचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.
हेदेखील वाचा : Ashadhi Wari: भाविकांसाठी खुशखबर! २७ जूनपासून थेट…; मंदिर समितीचा मोठा निर्णय
वारकऱ्यांना परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावरून गाड्यांची ऑनलाईन बुकिंग देखील करता येणार आहे. वारीच्या काळात स्थानिक वाहतुकीवर परिणाम होणार आहे. पण वारीनंतर लगेचच त्या मार्गांवर पूर्वीप्रमाणे गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वारी काळात बंद पडणाऱ्या गाड्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके देखील नेमली जाणार असून, त्याचे नियोजन महामंडळाकडून सुरू आहे.
बसगाड्यांचे नियोजनही पूर्ण
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार असून, त्याचे बुधवारी नियोजन झाले. एकाच गावातून किंवा परिसरातून 40 वारकरी येणार असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या गावातूनच बसगाडी उपलब्ध होईल. राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांसाठी पंढरपुरात चार बसस्थानके असतील, अशी माहितीही देण्यात आली.
वारकऱ्यांना गावातूनच बस
आषाढी वारीसाठी परिवहन महामंडळाने उपलब्ध केलेल्या काही बसगाड्या थेट वारकऱ्यांच्या गावातूनही निघणार आहेत. त्यासाठी किमान 40 प्रवाशांचे बुकिंग तथा तेवढे भाविक तेथून पंढरपूरला येणारे असायला पाहिजेत, अशी अट आहे.
हेदेखील वाचा : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगरसोनी-सावळजला मुसळधार पाऊस; ओढे-नाल्यांना पूर, जनजीवन अक्षरश: विस्कळीत