वारणेचा 240 मेगावॉट वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्प चंदगडला (फोटो सौजन्य-X)
वारणानगर : महाराष्ट्राने वीजेच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात उल्लेखनीय काम केले असून, येत्या काळात अपारंपारिक ऊर्जा स्त्रोताचे महत्व आणि आवश्यकता वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंपस्टोरेज) हा अपारंपारिक ऊर्जा स्रोतात भर घालणारा उपुयक्त प्रकल्प आहे. सहकारातून अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच राज्यात होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी (पंपस्टोरेज) जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात विधानभवन, मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. विनय कोरे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पंप स्टोरेज क्षेत्रात राज्य सरकारचा हा १६ वा सामंजस्य करार असून, १००८ कोटी रुपये गुंतवणूकीचा हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात तिलारी धरणावर होणार असून, यातून २४० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. भविष्यातील वीजेचा वाढता वापर लक्षात घेता पंप स्टोरेज आवश्यक ठरणार असून, त्याची वीज गरजेनुसार आणि आवश्यक तेवढ्या प्रमाणात वापरता येते. पंपस्टोरेजची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाने या संदर्भात ६५ हजार मेगा वॅट क्षमतेचे सामंजस्य करार केले आहेत.
आणखी एक लाख मेगा वॅट क्षमतेपर्यंत नेण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याचसोबत भविष्यातील पर्यायी व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात पारेषणात गुंतवणूक करुन २०३५ साली कॉरीडॉर उभे करावे लागणार आहे, त्यादृष्टीने शासन पारेषणात एक लाख कोटींची गुतंवणूक करत आहे. या सर्वात पंप स्टोरेजची भूमि्का महत्वपूर्ण असणार आहे.
पश्चिमी घाटामुळे पंपस्टोरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी प्राप्त झाली असून, वारणा समूहाने ज्याप्रमाणे सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन सहकारातील एक अग्रणी संस्था म्हणून वारसा निर्माण केला आहे. त्याच पद्धतीने या जलविद्युत प्रकल्पासाठी देखील ते भरीव योगदान देऊन प्रकल्प गतीमानतेने पूर्ण करण्यात पुढाकार घेतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.