मुंबई: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. (Mumbai Water Crisis) सातही धरणांमधील राखीव साठा मिळून आता मुंबईला 48 दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. जून महिना ओसरला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची (Mumbai Water Cut) टांगती तलवार आहे. (Mumbai News)
एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास अडथळा निर्माण झालायं. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाला आहे. मान्सूनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसोबत धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंतेत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच साठा असल्याची माहिती आहे.
15 दिवसात पाऊस आला नाही तर…
जून महिना निम्मा ओसरला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही. तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मुंबईतील तलाव आणि त्यामधील पाणी साठा
-अप्पर वैतरणा – शून्य टक्के
-मोडकसागर – 22.17 टक्के
-तानसा – 19.58 टक्के
-मध्य वैतरणा – 13.32 टक्के
-भातसा -5.27 टक्के
-विहार – 21.92 टक्के
-तुळसी – 28 टक्के
याचाच अर्थ 2023 मध्ये एकूण सातही धरणांमध्ये 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालिकेकडून राज्य सरकारला या धरणांमधील काही साठा राखीव ठेवावा अशी मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय जर तो पडला तरच पाणीकपात होणार नाही. मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
राज्यातील पाणीसाठ्यातही घट
दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून जर लवकर सक्रीय झाला नाही तर एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.