कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका. (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : काळम्मावाडी फिल्टर हाऊस येथील पंप नादुरुस्त झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरात ऐन पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळाले. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार शनिवारी शहरात घडले.
कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्याला सामोरे जावे लागत आहे. मागील दोन दिवसांपासून फिल्टर हाऊसमध्ये बिघाड झाल्याने शहरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक लाईन सुरु असल्याने याद्वारे कोल्हापूर शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पण वार्डमधील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही ठिकाणी पाणीच आले नाही, अशी अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेने टँकरच्याद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, नागरिकांची मागणी जास्त आणि पाणीपुरवठा कमी अशी गत झाल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले. तर टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या गाडी चालकांना तसेच सोबत असल्याने अधिकाऱ्यांना घेरावा घालून धारेवर धरण्यात आले.
फिल्टर हाऊसची दुरुस्ती करण्यासाठी अद्याप तंत्रज्ञान आले नसल्याने थेट पाईपलाईन योजनेच्या पंपाची दुरुस्ती झालेली नाही. कंपनीचे तंत्रज्ञ रविवारी येणार असून रात्रीपर्यंत दुरुस्ती झाली तर पाणी सुरळीत होईल, असा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे. सायंकाळी शिंगणापूर योजना सुरू करण्याची नियोजन केले आहे. रविवारी सर्व भागात नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असेही सांगितले आहे.
सध्या काळम्मावाडी थेट पॉईंट योजनेचे दोन पंपाद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने गुरुवारपासून दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यातून काही फरक पडला नाही. वार्डमध्ये पाणी देण्यात येणार असे जाहीर केल्याने नागरिक निर्दास्त होते. पण काही काळ भागात पाणी कमी दाबाने तर अन्य भागात वेळेत पाणी आलेच नसल्याने त्यांची त्रेधातिरिपीट उडाली. पुन्हा टँकरसाठी फोन सुरू झाले. त्यातून टँकरच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्या टँकरमधून आणलेली पाणी भरून घेण्यासाठी मोठ्या पाईप लावल्या होत्या. त्यामुळे पाणी भरून घेण्यात अडचणी येत होत्या.
पैसे घेऊन काही ठिकाणी थेट घरात पाईपने पाणी
पैसे घेऊन काही ठिकाणी थेट घरात पाईप जोडून टाक्या भरण्याची प्रकार चालू होते. यामुळे टँकर मोफत की पैसे देऊन असा प्रश्न नागरिकांना पडला होता. पंपाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने सॉफ्टवेअर एबीबी या कंपनीला संपर्क केला असून, अद्याप कंपनीची इंजिनियर आलेली नाहीत. आल्यानंतरच काळम्मावाडीवर थेट जाऊन हॉलची देखभाल करणार आहेत.