(फोटो सौजन्य - सोशल मिडीया)
राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे या भागांत उष्णतेमध्ये वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. जून महिना संपत आला तरी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दांडी मारली आहे. ठाण्यात देखील अद्याप मुसळधार पाऊस बरसला नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये दमट वातावरण आहे. त्यामुळे ठाणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तर पावसाअभावी ठाण्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांना सुमारे ४८ खासगी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. उकाडा आणि पाणीटंचाईच्या समस्येमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शासनाने लवकरात लवकर पाणीटंचाईच्या समस्येवर मार्ग काढावा, अशी मागणी गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
ठाण्याच्या शहापूर तालुक्यात सुमारे ४३ मोठे गावे आणि १५५ आदिवासी पाडे आहेत. शहापूर तालुक्याची लोकसंख्या सुमारे ६३ हजार ६८३ इतकी आहे. शहापूर तालुक्यातील १९८ गावांना ४२ खासगी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. तर मुरबाड तालुक्यात सुमारे १७ माेठे गावे आणि १८ आदिवासी पाडे आहेत. मुरबाड तालुक्याची लोकसंख्या सुमारे १८ हजार ४२० इतकी आहे. मुरबाड तालुक्यातील ३५ गावांना ६ खासगी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईच्या या समस्येमुळे शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परीसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पाऊस बरसला. नाशिकच्या हसूल येथे ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर रत्नागिरीतील खेडमध्ये ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.