देहूरोड : देहूरोड कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली, किन्हई व झेंडेमळा परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने सोमवारी ( दि. २८) दुपारपासून बुधवारी दोन-तीन तास वगळता अद्यापपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. या भागात बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी सायंकाळपर्यंत पाणी टँकर पाठविले नसल्याने पाण्याअभावी नागरिकांचे प्रचंड हाल झाले. चिंचोली भागात पाण्याचे कोणतेही स्रोत नसल्याने ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ आली. दरम्यान, जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच पाणीपुवठा सुरळीत करण्यात येईल, असे कॅंटोन्मेंट बोर्डाकडून सांगण्यात आले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने स्वतंत्र नळपाणी पुरवठा पाणीयोजना २००७ साली राबवण्यात आली आहे. या योजनेतून देहूरोड परिसर, देहूरोड बाजारपेठ, मामुर्डी, शितळानगर एक व दोन, गांधीनगर, शिवाजीनगर, थॉमस कॉलनी आदी भागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर १९८६ पासून चिंचोली, किन्हई व झेंडेमळा या भागासाठी एमआयडीसीकडून पाणी विकत घेऊन बोर्डामार्फत देण्यात येते.
-जलवाहिनीला वारंवार लागते गळती
या भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी देहूरोड आयुध निर्माणीनजीक वारंवार फुटण्याचे प्रकार घडत असून सोमवारी दुपारी जलवाहिनी फुटली होती. मात्र, जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी मंगळवारी रात्री सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कमी दाबाने चिंचोलीत पाणी पुरवठा सुरु झाला. दोन -तीन तास पाणी पुरवठा झाल्यानंतर पुन्हा जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले. दुपारनंतर जलवाहिनी दुरुस्ती करण्यात आली परंतु, नळाला हंडाभर पाणी भरल्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा बंद झाला. याबाबत नागरिकांनी चौकशी केली असता पुन्हा जलवाहिनी फुटली असल्याचे सांगण्यात आले.
-कर वसुलीवर भर, सुविधांकडे दुर्लक्ष
कॅंटोन्मेंट प्रशासन कर वसुलीसाठी गाडी भोंगे लावून सूचना दिल्या जातात. मात्र जलवाहिनी फुटल्यावर संबंधित विभागाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना देण्याची किंवा टँकरने पाणीपुरवठा करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे कर वसुलीवर भर देण्याऱ्या कॅंटोन्मेंट प्रशासनाचे करदात्यांना सुविधा पुरविण्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.
-राष्ट्रवादीकडून पाण्याच्या टँकरची मागणी
दरम्यान, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव व युवा कार्यकर्ते पैलवान धनंजय सावंत यांनी पाणीपुवठा पूर्ववत करण्यासाठी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले तसेच टँकर पाठविण्याची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सायंकाळनंतर दोन टँकर गावात आले. परंतु , सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या चिंचोलीसाठी दोन टँकर अपुरे पडले. गुरुवारी काही भागात टँकर पाठविण्यात आले मात्र बहुतांश नागरिकांना पाणी न मिळाल्याने त्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली.