शिवाजी विद्यापीठाच्या नावाला हात घालणाऱ्यांना ठोकून काढू; शिवप्रेमीचा इशारा (Photo : iStock)
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, अशी मागणी केली जात आहे.
शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दामध्येच प्रचंड ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे. या अस्मितेशी कोणी लुंग्या-सुंग्यानी खेळण्याचा प्रयत्न करू नये. शिवाजी विद्यापीठाचे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलं आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन तसा प्रयत्न केल्यास अशा प्रवृत्तीला ठोकून काढू, असा गर्भित इशारा कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शिवप्रेमींनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी काही संघटनांनी भूमिका घेतली आहे. नामविस्तार करून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, असं मागणी केली जात आहे. या मागणीसाठी 17 मार्चला मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाविरोधात कोल्हापुरात शिवप्रेमींची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मोठ्या संख्येवर शिवप्रेमी उपस्थित होते.
नामविस्ताराला समर्थन देणाऱ्या खासदार धैर्यशील माने, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि अशोकराव माने यांचा जाहीर निषेध यावेळी करण्यात आला. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यावेळी म्हणाले की, शिवाजी हा शब्दच मराठी माणसाची अस्मिता आहे. या शब्दांत प्रचंड ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठाला दिलेलं नाव योग्य आहे. ते कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये. जर कोणी बदलणार असेल तर त्यांना नाव मागचा इतिहास समजावून सांगू. अन्यथा अशा प्रवृत्ती ठोकून काढल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास कडाडून विरोध करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे, यासाठी सिनेट सदस्यांकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळही झाला. वकील अभिषेक मिठारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. श्वेता परुळेकर आणि अभिषेक मिठारी यांच्यासह सदस्यांनी आक्रमकपणे नामांतर प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी काळ्या फिती लावून नामविस्तार बदलास विरोध केला.
‘आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’, असे टी शर्ट घालून सिनेट सदस्य उपस्थित राहिले. या चर्चेदरम्यान माध्यमांना अधिसभेतून बाहेर काढण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने सभागृहात गोंधळ झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा घाट घालणाऱ्याचा निषेध व्यक्त करत सभेत पत्रके भिरकावण्यात आली.