'रयत शिक्षण संस्थेला जागतिक दर्जा देणार!' कर्मवीर पुण्यतिथी दिनी शरद पवारांचा मोठा संकल्प
पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम
“रयत शिक्षण संस्थेचे यश हे कोण्या एका व्यक्तीचे नसून हजारो सेवकांच्या प्रामाणिक कामाचे फलित आहे,” असे सांगत शरद पवार यांनी संस्थेतील शिक्षक, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. “काळ बदलतो आहे, शिक्षणाची पद्धत बदलते आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे तर जागतिक स्पर्धेसाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिक्षण सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. “भविष्यातील रोजगार आणि संशोधन क्षेत्र लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्ये देणे ही काळाची गरज आहे. रयत संस्था त्यासाठी पुढाकार घेणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी जागतिक स्तरावरील विद्यापीठांशी सहकार्य करण्यावरही भर दिला. “विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जगातील नामांकित विद्यापीठांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेच्या भावी शैक्षणिक धोरणाचीही झलक दिसून आली. गुणवत्तावाढ, अधिक शिष्यवृत्ती, संशोधनाला चालना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या माध्यमातून संस्था नव्या दिशेने वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळाले. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनीही रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करत “कर्मवीर अण्णांनी सुरू केलेली शिक्षण चळवळ आजही समाजाला दिशा देत आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमात ‘रयत’ मासिकाचे प्रकाशन, ‘रयत गुणवत्ता विकास आराखडा’ आणि ‘कर्मवीरांचे सांगाती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. रयत मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेला योगदान देणाऱ्या देणगीदारांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, रोहित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अनिल पाटील, विश्वजित कदम, रामशेठ ठाकूर, चेतन तुपे, महेंद्र लाड यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






