मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेकांची निराशा झाली आहे. निकालानंतर भाजपला राज्यामध्ये व देशामध्ये जोरदार फटका बसला. यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकालाची जबाबदारी घेत राजीनाम्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा देखील झाल्या. यावेळी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी राजीमान्याचे वक्तव्य केले होते. प्रचारावेळी केलेल्या या वक्तव्यामुळे आता निकालानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
आशिष शेलार संन्यास कधी घेणार?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये महायुती 17 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या असून भाजपपेक्षा जास्त जागा कॉंग्रेसला मिळाल्या आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी प्रचारावेळी एक विधान केलं होतं. “महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 18 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन”, असं शेलार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून आता त्यांच्यावर विरोधक हल्लाबोल करत आहेत. ठाकरे गटाचे नेते अरविंद सांवत यांनी आशिष शेलार संन्यास कधी घेणार?, असं म्हणत टोला लगावला आहे.
ही अहंकाराने डबडबलेली लोक – अरविंद सांवत
अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “त्यांनी जो राजकीय व्यभिचार मांडला. त्या राजकीय व्यभिचाराचा हा परिणाम आहे. आज त्यांना कळलं असेल की हे फार काळ चालत नाही. ते कधीतरी उघडकीस येतं आज त्याचे चटके त्यांना बसत आहेत. 45 प्लस बोलले होते. आता ते दुसरे (आशिष शेलार) शांत आहेत, लपलेत कुठेतरी. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 18 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं ते म्हणाले होते. आता त्यांना विचारा की राजकारणातून ते कधी संन्यास घेणार? जनता आशिष शेलारांच्या संन्यासाची वाट पाहत आहे. अहंकाराने डबडबलेली ही लोक आहेत. वैचारिक व्यभिचारी, सामाजिक व्यभिचारी आणि आर्थिक व्यभिचार केला, त्याचं प्रतिक देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावरही दोन व्यभिचारी आहेत. आमच्यांकडून जे गेले आणि त्यांना जे भेटले ते पण व्यभिचारी,” असे स्पष्ट मत अरविंद सांवत यांनी व्यक्त केले.