ओबीसींचे आरक्षण घटणार नाही
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानुसार, आंदोलन केले जात आहे. यावरच आता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं. ‘ओबीसी समाजाचे एक टक्काही आरक्षण कमी होऊ देणार नाही. मात्र, त्यासोबतच मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही’, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. ओबीसी समाजाचे एक टक्काही आरक्षण कमी होऊ देणार नाही. मात्र, त्यासोबतच मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. कुठल्याही समाजाचा हक्क काढून दुसऱ्याला देणे योग्य नसल्याचे महसूलमंत्री बावनकुळे यांनी म्हटले आहे. देशात ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे हजारो लोकांना फायदा झाला आहे. हे आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिले आहे. तसेच ‘सारथी’ संस्थेमार्फत मराठा समाजालाही मोठा फायदा करून दिला.
दरम्यान, सरसकट आरक्षण शक्य नाही. ज्यांच्याकडे आवश्यक दस्तऐवज आहेत, त्यांनाच ओबीसींचा लाभ मिळेल. सर्वेक्षण प्रक्रिया सुरू आहे आणि ती कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी
काँग्रेस आणि महाविकास आघाडीने ओबीसीमधून आरक्षण द्यावे का? याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस तर नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे. जर आज ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतील, तर ओबीसींच्या ३५३ जातींचे आधीच कमी असलेले आरक्षण काढून मराठ्यांना द्यायचे का? असा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही
ओबीसी आयोग, ओबीसी मंत्रालय आमच्या सरकारने आणले, ते ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. यात आणखी वाढ करता येईल, या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.