अवकाळीत पाटण तालुक्यात ७४ घरे व १३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान (File Photo : Unseasonal Rain)
सेनगाव : सेनगाव तालुक्यात शनिवारी अवकाळी पावसासह विजेच्या कडकडाटाने तालुक्यातील एक महिलेचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यातच तीन पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुक्ताबाई रामगिरी गिरी असे मृतक महिलेचे नाव आहे.
सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसासह विजेच्या कडकडाटाने थैमान घातले असून, या अवकाळी संकटाने अनेकांचे जीव जात आहेत. पाळीव प्राण्याचे मृत्यू होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसानासह सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सेनगाव तालुक्यात प्रचंड वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसाने सुरुवात होताच विजेच्या कडकडाटाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, जाम शेत शिवारात रुक्मिणी मनोहर बंदुके या विजेच्या धक्क्याने गंभीर भाजून जखमी झाल्या असल्याने त्यांना उपचार कमी हिंगोली येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गर्भवती महिला अंकिता संतोष बोडखे यांना विजेची आस लागल्याने त्या चक्कर येऊन पडून जखमी झाल्या. संतोष किसन बोडखे व नंदाबाई किसन बोडखे (सर्व रा.जाम) या शेतात काम करत असताना जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
सध्या वातावरणात प्रचंड बदल झाला असून, या वातावरण बदलामुळे तालुक्यात सतत प्रचंड वारा व जोराचा मुसळधार पाऊस येत असून, या दरम्यान विजेचा मोठ्या प्रमाणात कडकडाट होत असल्याने या नैसर्गिक आणीबाणी काळात शेतकऱ्यासह इतर मजूर वर्गांनी अशा वेळेस सुरक्षितस्थळी थांबून आपला व आपल्या पाळीव प्राण्याचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन सेनगाव प्रभारी तहसीलदार देवराव कारगुडे यांनी केले आहे.