कॅनच्या पाण्याची गुणवत्ता कितपत योग्य? शुद्धतेचे काय? यवतमाळात रोज हजारो लिटर पाण्याची विक्री
आता उन्हाळा तापू लागला असून कॅनच्या पाण्याचा धंदाही तेजीत आला आहे. पण शहरात दररोज कॅनद्वारे विक्री होणाऱ्या थंडगार पाण्याच्या शुद्धतेची शाश्वती कोण देणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ उन्हाळाच नव्हेतर शहरात वर्षभर पाणी विकत घेण्याचा ट्रेंड आहे. मात्र पाण्याच्या गुणवत्तेवर प्रशासनाचे लक्षच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.जमिनीतून पाणी उपसा करून त्याचा कॅनद्वारे पुरवठा करणारे व्यावसायिक आता चौका चौकात प्लँट सुरू करून बसलेले आहेत. पण या व्यापारावर नियंत्रण कोण ठेवणार याची प्रशासनातच स्पष्टता नाही. अशा प्लॅटवर कारवाईचे अधिकार अन्न व औषधी प्रशासन, नगर परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत.(फोटो सौजन्य – istock)
पण यापैकी कुणीही गेल्या काही दिवसात कारवाई केल्याचे दिसून आले नाही. एवढेच काय, यवतमाळ शहरात नेमके किती प्लॅट आहे, दरदिवशी जमिनीतून किती पाण्याचा उपसा होतो, किती रुपयाला कॅन विकली जाते, त्यासाठी किती डिपॉझिट घेतले जाते, त्याची वाहतूक व पुरवठादार कोण, याबाबतची सविस्तर माहितीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही. उलट आमच्याकडे प्लँटबाबत कुणी तक्रारीच केल्या नाही, असे सांगून प्रशासन हात झटकते. शुद्ध पाणीपुरवठ्याच्या नावाखाली केवळ थंड पाणी नागरिकांना दिले जाते. त्यामुळे यवतमाळकरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकही या पाण्याच्या शुद्धतेकडे फारसे लक्ष देत नाही. त्याचाच फायदा घेत पाणीपुरवठादारांकडून लूट सुरू आहे.
कुणी ३० रुपयाला तर कुणी ४० रुपयाला पाण्याची कॅन (कुलकेज) विकत आहे. शिवाय कॅनच्या किमतीएवढे डिपॉझिटही घेतले जात आहे. यवतमाळ शहरात या पाण्याच्या व्यापारातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांमध्ये तर सर्रास अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. एकीकडे प्रशासनाने सामान्य नागरिकांना बोरवेल खोदण्यासाठी नियम घालून दिले आहे. तर दुसरीकडे थंडगार पाण्याचा व्यापार करणारी मंडळी दररोज जमिनीतून हजारो लिटर पाण्याचा उपसा करीत आहे. या व्यवहाराचे प्रशासनाकडे कुठलेचे रेकॉर्ड नसल्याने पाणीपुरवठादारांनी प्राप्तीकर, जीएसटी भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातसुद्धा पाण्याचा हा व्यापार सुरु आहे.
Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका
नाईलाज आणि लूट उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात. त्यामुळे थंडगार पाणी विकत घेणे हाच एकमेव आधार उरतो. त्याचा फायदा उठवत व्यावसायिकांनी लूट सुरू केली आहे. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत पाण्याचे प्लॅट सुरु आहेत. त्याद्वारे रोज हजारो कॅनचा घरोघरी पुरवठा केला जात आहे. मात्र येथे नियम पाळले जातात का, हे पाण्यासाठी यंत्रणेला सवडच मिळत नाही.






