महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेखचा ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताब बेकायदशीर; कुस्ती महासंघाचा कडक कारवाईचा इशारा
नवी दिल्ली : भारतातील कुस्तीला खोट्या किताबामुळे उतरती कळा लागली आहे. भरपूर खोट्या संघटना खोट्या किताबांचे आयोजन करून लोकांची फसवणूक करीत आहेत. ‘रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटने’ने ५ नोव्हेंबरला पंजाब राज्यात नवांशहर जिल्ह्यात कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘रुस्तुम-ए-हिंद’ हे नाव वापरले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवान सिकंदर शेख ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताबाचा मानकरी ठरला. मात्र, ही स्पर्धा बेकायदा असून, सिकंदर शेखचा किताबही बेकायदा आहे. त्यामुळे या बेकायदा स्पर्धेवर ‘भारतीय शैली कुस्ती महासंघा’ने (आयएसडब्ल्यूएआय) कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
आयोजकांना धाडली नोटीस
महाराष्ट्राचा नामांकित मल्ल सिकंदर शेखने नुकतीच एक स्पर्धा जिंकल्यानंतर ‘रुस्तुम-ए-हिंद’ हा आयोजकांकडून मानाचा किताब देण्यात आला होता. आता या किताबालाच थेट ‘भारतीय शैली कुस्ती महासंघा’ने बेकायदेशीर ठरवले आहे. सिंकदर शेखची कारकीर्द बरीच वादाची राहिली आहे. त्याने मागील वर्षी महाराष्ट्र केसरीवरूनसुद्धा अंतिम लढत वादात ठरली होती. आता पंजाबमधील नवांशहर येथे खेळलेल्या अंतिम लढतीत विजय मिळवत रुस्तुम-ए-हिंद किताब पटकावला होता. परंतु आता कुस्ती महासंघानेच या किताबाला बेकायदेशीर ठरवत आयोजकांना नोटीस पाठवली आहे.
कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात
भारतीय शैली कुस्ती महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष जितेंदर राठी आणि महासचिव गौरव सचदेवा यांनी पत्रकाद्वारे हा कारवाईचा इशारा दिला आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ गेली ६८ वर्षे ‘रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ या स्पर्धांचे आयोजन करीत आहे. या तीनही किताबांचे शासकीय नोंद असलेले ट्रेडमार्क आणि कोर्टाची ऑर्डर भारतीय शैली कुस्ती महासंघाकडे आहे. मात्र, ५ नोव्हेंबरला पंजाबमधील नवांशहर जिल्ह्यात ‘रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटने’ने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे ‘रुस्तुम-ए-हिंद’ हे नाव वापरले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रतिभावान मल्ल सिकंदर शेखने ‘रुस्तुम-ए-हिंद’ किताब पटकाविला. मात्र, आता हा किताब वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे महासचिवांची सक्त ताकीद
संघटनेचे महासचिव गौरव सचदेवा म्हणाले, ‘आमचे ‘रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ हे ट्रेडमार्क परवानगीशिवाय वापरणे हे ट्रेडमार्कचे उल्लंघन आहे. त्यासाठी कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ कायदेशीर कारवाई करण्यासाठी आता कायदेशीर सल्लागारांची चर्चा करीत असून, लवकरच सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठविणार आहोत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
या मोठ्या पुरस्कारांचा होतोय गैरवापर
रुस्तुम-ए-हिंद’, ‘हिंद केसरी’ आणि ‘भारत केसरी’ किताबामुळे सरकारी नोकरी, शासकीय पेन्शन योजना आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेता येतो. मात्र, काही बनावट संघटना आणि पैलवान याचा गैरवापर करीत आहेत. जे लोक आमच्या किताबाचे नाव स्वतःच्या नावापुढे वापरून समाजात खोटा नावलौकिक मिळवत आहेत, अशा लोकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.’
– जितेंदर राठी (कार्यकारी अध्यक्ष, आयएसडब्लूएआय)