रुपाली चाकणकरांनी यशश्री शिंदेच्या कुटूंबियांची भेट घेतली
उरणमध्ये झालेल्या यशश्री शिंदे हत्याकांडामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेखला शिक्षा व्हावी यासाठी सर्वचजण प्रयत्न करत आहेत. दाऊद शेखला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी सर्व राजकीय पक्ष व विविध संघटना व संस्थांनी उरण पोलीस स्टेशनवर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यशश्री शिंदेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडील व नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि त्यांचे सांत्वन केले. तसेच उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार, असं देखील चाकणकर यांनी यावेळी सांगितलं.
हेदेखील वाचा- यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू! एक टॅटू दाऊदच्या नावाचा, टॅटू आर्टिस्ट पोलिसांच्या रडारवर
यशश्रीच्या आई वडीलांनी रुपाली चाकणकर यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि यशश्रीला न्याय मिळवून देण्याची विनंती केली. यशश्रीला न्याय मिळवून देणार आणि या हत्याकांडातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन रुपाली चाकणकर यांनी यशश्रीच्या आई-वडीलांना दिलं.
हेदेखील वाचा- उरण हत्याकांड प्रकरण: यशश्रीची हत्या का केली?; दाऊद शेख पोपटासारखा बोलायला लागला
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर, युवा अध्यक्ष समद बोंबले,अमित साहू, संदेश म्हात्रे, दिनेश पाटील, महिला पदाधिकारी शोभा चौगुले, देवकी शिंदे, साधना वाणी, केदारे मॅडम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी शिंदेच्या कुटुंबीयांची भेट घेउन त्यांचे सांत्वन केले. उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपील कठोर शिक्षा देण्याची मागणी रुपाली चाकणकर व प्रशासनाकडे केली आहे.
यानंतर रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, आरोपीला जात-पात धर्म पक्ष काहीही नसतो. ती एक विकृती आहे. कोणीही जातीपातीचे राजकारण करू नये. दिवसेंदिवस समाजात अशा विकृती वाढत चालल्या असून अशा विकृतीचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. समाजात वाईट कृत्य, वाईट गोष्टी घडू नये यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. राज्यात महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस प्रशासन त्याचे काम योग्यरीत्या करीत आहेत. यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल यासाठी मी जातीने लक्ष घालेन.
दरम्यान, 2018-19 पूर्वी यशश्री शिंदे आणि दाऊद शेख एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्री देखील होती. उरणमध्ये यशश्री ज्याठिकाणी राहायची त्याच ठिकाणी दाऊद सुध्दा राहात होता. पण 2019 मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली आणि त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या प्रकरणी त्याला तुरूंगात जावे लागले होते, तुरुंगातून सुटल्यावर तो कर्नाटकला गेला. त्यानंतर दाऊद पुन्हा उरणमध्ये आला. उरणमध्ये आल्यावर त्याने यशश्रीसोबत फोनवरून संपर्क केला आणि यावेळी दोघांनी भेटायचं ठरवलं. या भेटीत यशश्रीने लग्नाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या दाऊदने तिची हत्या केली.