"...आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा", यशोमती ठाकूर यांचा निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा (फोटो सौजन्य-X)
मुंबई : लोकसभा विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी केलेल्या ‘मत चोरी’च्या गौप्यस्फोटानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आधारीत ‘द, ECI फाईल्स’ असे सिनेमा स्टाईलमध्ये पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत; ‘रिलीज झाला आहे, सत्य घटनेवर आधारित ! प्रत्येकाने जरुर बघा, आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा !* कॅप्शन देत केंद्रीय निवडणुक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप लोकसभा विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी निवडणूक आयोगावर करत दि. ७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी पुन्हा राहूल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणुक आयोगावर आरोप केले आहेत. राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपावरुन सध्या देशभरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘द ईसीआय फाईल्स’ या शिर्षकाचे एक सिनेमा स्टाईल पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकांऊंटवर पोस्ट केले आहे.
मागील दोन तीन वर्षांत राजकीय भाष्य करणारे द ताश्कंद फाईल्स, द काश्मिर फाईल्स, द केरला फाईल्स, द बंगाल फाईल्स असे चित्रपट प्रदर्शित झाले. हे चित्रपट भाजपच्या राजकीय विचारधारेला खतपाणी घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून झाले. याचाच धागा पकडत यशोमती ठाकूर यांनी आता निवडणूक आयोगावर राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपानंतर द ईसीआय फाईल्स अशा नावाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
या पोस्टरमध्ये केंद्रीय निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एन्टॉगॉनिस्ट दाखविण्यात आले आहे. तर राहूल गांधी यांचा संविधान हातात घेतलेला फोटो प्रोटोगॉनिस्ट म्हणून वापरला आहे. अ फिल्म बाय नॅशनॅलिस्ट प्रोडक्शन असे देखील त्यावर लिहिलेले आहे. त्यातून राष्ट्रप्रेमी यांच्याकडून निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा उघड पाडणारा ‘द ईसीआय फाईल्स’ चित्रपट असल्याचे दाखवण्यात आले आहे.
रिलीज झाला आहे,
सत्य घटनेवर आधारित !‘THE E.C.I. FILES’
प्रत्येकाने जरुर बघा, आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा ! #VoteChori #RahulGandhiExposed #RahulGandhi #ECI #BJP #Congress #incindia pic.twitter.com/STccbXqGta
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 20, 2025
राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन जो गौप्यस्फोट केला आहे, त्या अनुशंगाने रिलीज झाला आहे, सत्य घटनेवर आधारित ! ‘THE E.C.I. FILES’ प्रत्येकाने जरुर बघा, आपल्या मताचे आणि लोकशाहीचे रक्षण करा! असे कॅप्शन देखील लिहीलेले आहे.
केंद्रीय निवडणुक आयोग आणि भाजपवर थेट निशाणा साधत यशोमती ठाकूर यांनी अनोख्या पद्धतीने मत चोरीच्या मुद्द्यावर केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. निर्भिड आणि थेटपणे भिडणाऱ्या आक्रमक नेत्या अशी यशोमती ठाकूर यांची ओळख आहे. याच आक्रमक शैलीत त्यांनी सोशल मीडियावरुन भाजप आणि निडवणूक आयोगावर व्यंगात्मक हल्लाबोल केला आहे.