ठाणे: राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. पोलीस शिपाई (Police constable) होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. पोलीस भरतीत (Police Recruitment) डॉक्टर, अभियंता, पदवीधर देखील सहभागी झाल्याने या पोलीस भरतीची मोठी चर्चा सुरु आहे. मात्र नोकरी मिळवण्याच्या उद्देषाने तरुण उत्तेजक द्रव्यांना बळी पडत आहेत. पोलीस भरतीमध्ये अनेक तरुण उत्तेजक द्रव्य सेवन करून भरतीसाठी उतरत आहेत. ठाण्यातही (Thane) पोलीस भरतीदरम्यान, असाच प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
[read_also content=”एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन 7 ऐवजी 13 तारखेला झालं जमा, हक्काचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी करावा लागतोय संघर्ष, काय आहेत कारणे ? https://www.navarashtra.com/maharashtra/reasons-behind-the-late-salary-of-msrtc-workers-nrsr-361536.html”]
ठाणे शहरात सुरू असणाऱ्या पोलीस भरती दरम्यानच एका तरुणाने उत्तेजक द्रव्य असणारे इंजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यभरात सध्या पोलीस भरती सुरु असून नांदेड, रायगड नंतर आता ठाण्यातही उत्तेजक द्रव्ये घेणारा तरुण आढळला आहे. पोलीस भरतीच्या 1600 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी उमेदवारांना घेऊन जात असतानाच तरुणाने उत्तेजक द्रव्य घेतले.
या तरुणाने आपल्या बॅगमधून उत्तेजक द्रव्य असणारे इंजेक्शन काढले आणि स्वतःला टोचून घेतले. यावेळी इतर उमेदवारांच्या ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाच्या सामानाची झडती घेतली असता 2 सिरींज आणि एक द्रव्य पदार्थ असणारी बाटली सापडली. यानंतर पोलिसांनी हे सर्व जप्त करत तरुणाला पुढील कारवाईसाठी राबोडी पोलिसांच्या हवाली केले.
दुसरीकडे अहमदनगरमध्येही असाच प्रकार आढळून आलाय. पोलीस भरती प्रक्रियेत उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून एका उमेदवाराला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अहमदनगर येथे 4 जानेवारीपासून 239 पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी 11 हजार 278 जणांचे अर्ज आले होते. त्यांतल पात्र पाच हजार 48 जणांची चाचणी झाली. या भरती प्रक्रियेत अरणगाव येथे धावण्याच्या चाचणी घेण्यात येत आली.
दरम्यान, धावण्याच्या चाचणी वेळी एका उमेदवाराने उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या संशयावरून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान त्याच्याकडे इंजेक्शन आणि काही औषध सापडली. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.