फोटो सौजन्य - Social Media
बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाणारे आमिर खान यांनी यंदाचा स्वातंत्र्यदिन अधिकच खास करून टाकला. मेलबर्न येथे आयोजित १६ व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये आमिर खान यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्यांनी अभिमानाने भारतीय तिरंगा फडकावला. हा क्षण फक्त त्यांच्यासाठीच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा ठरला. आमिर यांच्या झेंडावंदनावेळी उपस्थितांनी देशभक्तीपर गीते आणि टाळ्यांनी वातावरण भारून टाकले.
हा फिल्म फेस्टिव्हल १४ ऑगस्टपासून २४ ऑगस्टपर्यंत चालणार असून भारतीय सिनेमातील उत्तम चित्रपट आणि डिजिटल शो यांना येथे प्रदर्शित व सन्मानित करण्यात येणार आहे. १५ जून २०२४ ते १४ जून २०२५ दरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही यात फिल्म स्क्रीनिंग, संवाद सत्र, स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
आमिर खानचा नुकताच प्रदर्शित झालेला सितारे ज़मीन पर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. हा चित्रपट केवळ मुलांनाच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावला. यात आमिरसोबत १० नवे कलाकार सहभागी झाले असून त्यामुळे चित्रपटात नव्या उर्जेची आणि ताजेपणाची भर पडली. जेनेलिया देशमुख हिनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आर. एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता आणि आता आमिर खान टॉकीज (जनता का थिएटर) या यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध आहे.
याचबरोबर आमिर खानचा आणखी एक कूली हा मल्टिस्टारर चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. यात रजनीकांत, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हासन यांसह अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. एका बाजूला त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे, तर दुसऱ्या बाजूला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये तिरंगा फडकावून आमिर खान यांनी भारतीय संस्कृती आणि सिनेमाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांचा हा अभिमानास्पद उपक्रम भारतीयांच्या हृदयात कायमस्वरूपी कोरला जाईल यात शंका नाही.