Marathi Hindi Language Row Bigg Boss Fame Actor Akshay Kelkar Share Post On Social Media
राज्यामध्ये हिंदी भाषेवरून मोठ्या प्रमाणावर वादंग उठलेला पाहायला मिळत आहे. मीरा- भाईंदरमध्ये काही मनसैनिकांनी एका दुकानदाराला हिंदी भाषेवरून बेदम मारहाण केली होती. हा वाद चर्चेत असतानाच नुकतंच एका बिझनेसमनने मराठी- हिंदी भाषेच्या वादामध्ये उडी घेतलीये. त्याने सोशल मीडियावर आणि एका मराठी वृत्तवाहिनीवर जाहीरपणे सांगितलं की, “मी मराठी भाषा शिकणार नाही.” हे कमी म्हणून काय, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमातून थेट “जय गुजरात”ची घोषणा केली.
ठाकरेंच्या मेळाव्यासाठी दिग्गज मराठी कलाकारांची फौज, व्यक्त केला आनंद
या संपूर्ण वादावर विरोधक, मराठी सामान्य नागरिक आणि मराठी सेलिब्रिटी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. आता अशातच ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता अक्षय केळकरने मराठी भाषेबद्दल एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली चर्चेत आली आहे. अक्षयने त्या पोस्टमध्ये, “तुम्ही ज्या राज्यात राहत आहेत, ती भाषा यायलाच हवी, तुम्ही त्या राज्याची भाषा बोलण्याची अपेक्षा करण्यात चूक कशी असते?” असा प्रश्न उपस्थित केला. “जर ती भाषा येत नसेल तर सौजन्यपूर्वक मान्य करावे.”, असं देखील अभिनेता पोस्टमध्ये म्हणाला.
प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीच्या वडीलांवर गोळीबार, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अक्षय केळकर म्हणतो की, “माझ्या आजुबाजूला आणि माझ्या व्यवसायात असे माझे अनेक मित्र- मैत्रिणी आणि परिचित लोक आहेत, जे जन्माने अमराठी आहेत. केवळ ४ ते ५ वर्षांपासून ते महाराष्ट्रात आणि मुंबईत वास्तव्य करत आहेत परंतू ते खूप छान मराठी बोलतात. त्याचसोबत अशीही काही माणसे आहेत, ज्यांना बरीच वर्ष इथे राहूनही संपूर्ण शुद्ध मराठी शिकायला जमत नाहीये, तरीही तोडकी मोडकी का असेना, पण मराठीत बोलायचा प्रयत्न करतात. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, तेव्हा तो आपल्या कृतीतून, प्रयत्नांतून स्पष्ट दिसत असतो. तुम्ही ज्या राज्यात वास्तव्याला आहात, त्या राज्याची भाषा तुम्हाला बोलता येणं ही अपेक्षा खरंच इतकी मोठी आहे? तुम्हाला शुद्ध मराठीची कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये, तर फक्त गरजेपुरते मराठी बोलता येईल इतकीच अपेक्षा आहे. प्रत्येक राज्य जर तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेच्या आधारेच ठरविण्यात आला आहे, तर त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली जावी ही अपेक्षा चूक कशी काय असू शकते? तरीही, कोणत्याही कारणामुळे, जर इथली भाषा बोलता येत नसेल, तर किमान सौजन्यपूर्वक ही बाब मान्य करून, मुजोरी न दाखवता ही संवाद साधता येऊ शकतो. इथे प्रत्येक जण, आपापल्या परीने कमवत आहे. कमवायलाच आलेला आहे. प्रत्येक जण कष्ट करून आपापल्या पद्धतीने जगतो आहे. तेव्हा, स्वतःच्याच जगण्यासाठी मिळवलेल्या उत्पन्नाचा आणि जमवलेल्या संपत्तीचा हा कोणता माज? जरी तुमचा जन्म इथे झाला नसला तरी, आपल्या कर्मभूमी बद्दल किमान आदर तरी असावा!”