गॅरेजमध्ये काम ते एव्हरग्रीन हिरो; हालाखीच्या दिवसांत राहिलेल्या अनिल कपूर यांचं 'या' चित्रपटाने पालटलं नशीब
वयाची साठी गाठूनही सध्याच्या आघाडीच्या तरुण अभिनेत्यालाही लाजवेल अशी फिटनेस असणारा अभिनेता म्हणजे, अनिल कपूर… अभिनेता अनिल कपूरला अवघी इंडस्ट्री मिस्टर इंडिया नावाने ओळखते. या मिस्टर इंडियाचा आज वाढदिवस आहे. अभिनेता अनिल कपूर आज २४ डिसेंबर २०२४ रोजी ६८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सर्वात फिट अभिनेता म्हणून अनिल यांच्याकडे पाहिले जाते, कारण त्यांचा पासष्ठीनंतरचाही फिटनेस फंडा कमाल आहे. अजूनही बॉलिवूडमध्ये त्यांचे नाव पाहून चाहते थिएचरमध्ये गर्दी करतात. त्यांच्या नावावर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटही आहेत. मात्र यशाच्या शिखरावर पोहोचणं अनिल यांच्यासाठी काही सोपी गोष्ट नव्हती. एक काळ असा होता जेव्हा ते राज कपूर यांच्या गॅरेजमध्येही राहिले होते. ‘मिस्टर इंडिया’च्या वाढदिवशी जाणून घेऊया हा किस्सा…
मीडिया रिपोर्टनुसार, अनिल कपूर जेव्हा मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांची परिस्थिती बेताची होती. मुंबईमध्ये आल्यानंतर अनिल कपूर आपल्या फॅमिलीसोबत राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहिले. नुकतेच मुंबईमध्ये आल्यामुळे अभिनेत्याकडे पैशांचा स्त्रोतही नव्हता. पैशांची वणवण असल्यामुळे अनिल यांना राज कपूर यांच्या गॅरेजमध्येच राहावं लागलं. अनिल यांचे वडील सुरिंदर कपूर आणि राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर दोघंही चुलत भाऊ आहेत. त्यामुळे अनेक वर्षे अनिल कपूर राज यांच्या गॅरेजमध्ये राहिले होते. काही वर्षांनंतर अनिल यांनी मुंबईत स्वत:चं घर भाड्याने घेतलं, त्या भाड्याच्याही घरात ते अनेक वर्ष राहिले.
अनिल कपूर मुंबईत कोणत्या वर्षी आले, याबद्दल कुठेही माहिती नाही. पण अनिल यांनी आपल्या सिनेकरियरची सुरुवात १९७९ मध्ये रिलीज झालेल्या उमेश मेहरा दिग्दर्शित ‘हमारे तुम्हारे’ चित्रपटातून केली. या चित्रपटात त्यांनी लहान भूमिका साकारली होती. पण अनिल यांना मुख्य भूमिका १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘वो सात दिन’ चित्रपटामध्ये केली होती. या चित्रपटातूनच अनिल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करियरच्या सुरुवातीच्या काळात अनिल यांनी १९८० मध्ये ‘वंश वृक्षम’ या तेलगू चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले. ‘वो सात दिन’नंतर अनिल यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. ‘बेटा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘तेजाब’, ‘कसम’, ‘राम लखन’, ‘हमारा दिल आपके पास है’, लाडला’, ‘नायक’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीने दिली कुलाबा किल्ल्याला भेट, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने अनिल यांचं नशीब पालटलं. या चित्रपटाने अनिल यांना सुपरस्टार बनवलं. निर्मात्यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटासाठी सर्वात आधी अमिताभ बच्चन यांना ऑफर दिली होती. पण ती ऑफर त्यांनी नाकारल्यामुळे अनिल यांनी त्या आलेल्या संधीचं सोनं केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही आणि अजूनही यशस्वी चित्रपटांची त्यांच्या फिल्मी करियमध्ये घौडदौड सुरूच आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता अनिल कपूर १४० कोटी संपत्तीचे मालक आहेत. अभिनेत्याचं मुंबईव्यतिरिक्त दुबई, कॅलिफोर्निया आणि लंडनमध्ये घरं आहेत. शिवाय त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्यांच्याकडे असणाऱ्या लग्झरी कार्समध्ये बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, बेंटली, जॅग्वार आणि ऑडीचा समावेश आहे. चित्रपट तसेच जाहिरातींच्या माध्यमातून अनिल यांनी ही संपत्ती कमावली आहे.