'धर्मवीर २'ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर २’ अखेर बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपट २७ सप्टेंबर देशासह परदेशात रिलीज झालेला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. काही तासांपूर्वीच झी स्टुडिओज कडून चित्रपटाच्या कमाईचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. इतर चित्रपटांप्रमाणेच प्रेक्षकांनी ” ‘धर्मवीर २’ मुक्काम पोस्ट ठाणे, साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” चित्रपटालाही उत्तम प्रतिसाद दिला आहे. मुख्य बाब म्हणजे चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २०२४ या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल १ कोटी ९२ लाखांची कमाई केलेली आहे. खरंतर मराठी सिनेसृष्टीमध्ये पहिल्याच दिवशी करोडोंची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट आहे.
‘धर्मवीर’च्या घवघवीत यशानंतर प्रेक्षकांच्या भेटीला ‘धर्मवीर २’ आला आहे. झी स्टुडिओज मराठीने “पहिल्याच दिवशी नेट १.९२ कोटी कमवून ‘धर्मवीर-२’ सिनेमा ठरला या वर्षीचा सगळ्यात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट!! संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांचे मनापासून अभिनंदन!!” असं कॅप्शन देत इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केलेली आहे. प्रसाद ओक आणि क्षितीश दाते स्टारर ‘धर्मवीर २’ चित्रपटाला चाहते कसा प्रतिसाद देतात ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘धर्मवीर २’चं बजेट १५ कोटी रुपयांचं आहे. अद्याप हिंदी भाषेतील कमाईचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. प्रेक्षकांना हिंदी भाषेतील कमाईचा आकडा जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
‘धर्मवीर २’ची मराठी आणि हिंदी भाषेतील कमाई किती होते ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाची एकूण कमाई २ कोटी ५ लाख होती. येत्या काही दिवसांतच हा आकडाही ‘धर्मवीर २’ चित्रपट पार करेल. ‘धर्मवीर २’ची पटकथा प्रवीण तरडेंनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे. चित्रपटात प्रसाद ओक, क्षितीश दाते, मकरंद पाध्ये, स्नेहल तरडे आणि मकरंद दाते हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.






