फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यांना नव्या उंचीवर नेणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. पोस्टरसोबतच या चित्रपटाची ताकदीची टेक्निकल टीमही चर्चेत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केले असून, ते ‘अज्ञात’ या लघुपटासाठी नॅशनल अवॉर्ड विजेते आहेत. संगीताची जबाबदारी घेतली आहे पद्मविभूषण इलैयाराजा यांनी, ज्यांनी ‘सिंधू भैरवी’, ‘सागरा संगमम’, ‘रुद्रवीणा’ यांसारख्या चित्रपटांना अमर्याद लोकप्रियता दिली आहे. छायाचित्रणाची धुरा राज्य पुरस्कार विजेते अमलेंदू चौधरी सांभाळत आहेत, ज्यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘न्यूड’, ‘छिछोरे’ सारख्या चित्रपटांत काम केले आहे.
संपादनासाठी आशिष म्हात्रे, मेकअप डिझाइनसाठी श्रीकांत देसाई, वेशभूषेसाठी सचिन लोवाळेकर, आर्ट डायरेक्शनसाठी संदीप मेहेर, साऊंड डिझाइनसाठी जयेश ढाकण, कास्टिंग डिरेक्टर म्हणून रोमिल, तसेच डिआय कलरिस्ट म्हणून रेड चिलीजचे मकरंद सुरते यांचा सहभाग आहे. इतके मान्यवर एकत्र आल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देणारा हा प्रकल्प ठरणार आहे.
पोस्टरमध्येच भव्यता आणि पारंपरिकतेची झलक दिसून आली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित या चित्रपटात कथा, संगीत आणि अभिनयाचा संगम प्रभावीपणे सादर केला जाणार आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी सांगितले की, ” ‘गोंधळ’ या चित्रपटाची संकल्पना पारंपरिक असूनही त्याला साकारताना आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याचा प्रयत्न केला आहे. अशा दमदार टेक्निकल टीमसोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट भव्यतेचा नवा अनुभव देईल तसेच महाराष्ट्रसह विविध राज्यांत ही महाराष्ट्राची परंपरा ठसा उमटवेल. यात अशा काही गोष्टी आहेत, ज्या ७०एमएमवर भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहेत.’’
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, माधवी जुवेकर, अनुज प्रभू, ऐश्वर्या शिंदे, सुरेश विश्वकर्मा, कैलाश वाघमारे यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट संतोष डावखर यांनी लिहिला असून, सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. ‘गोंधळ’मुळे मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राची परंपरा नव्या भव्यतेत अनुभवायला मिळणार असून, या चित्रपटाची आतुरता आता आणखीनच वाढली आहे.