सौजन्य - नवराष्ट्र टीम
साहिल महेंद्रसिंग चव्हाण व बालाजी रामजी उमाप (रा. स्वारगेट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या गोळीबारात मोजेश शेखापुरे हा तरुण जखमी झाला होता. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे व अंमलदार पोलिस हवालदार दयानंद तेलंगे, पोलिस अमलदार मयूर भोकरे, अमर पवार, राजेंद्र लांडगे, रणजीत फडतरे, रहीम शेख यांनी केली आहे.
स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही तरुणांनी हवेत गोळीबार करून दहशत माजवली होती. टोळ्यांमधील संघर्षातून प्रकार घडला होता. यानंतर दोन दिवसांपुर्वी या गोळीबाराचा बदला म्हणून काही टोळक्याकडून मार्केटयार्ड परिसरातील वखार महामंडळ परिसरात मोजेश या तरुणावर गोळीबार केला होता. यात मोजेश जखमी झाला होता. त्यानंतर टोळके पसार झाले होते. दरम्यान, या टोळक्याचा शोध पोलिस घेत होते.
यादरम्यान, पोलिस हवालदार दयानंद तेलंगे व पोलिस अमलदार मयूर भोकरे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, दोन्ही आरोपी नांदेड सिटी गेटजवळ जोगेश्वरी येथील मागील बाजूस लपून बसले आहेत. तसेच त्यांच्याजवळ गोळीबारावेळी वापरलेले पिस्तूल असून ते पोलिस पथकावर गोळीबार करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने या भागात चारही बाजूने सापळा रचला. त्यानूसार, पथकाने चारही बाजूने छापा टाकून या दोघांना पकडले.
दरम्यान त्यांच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींकडे विचारपूस करून गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी शोधून जप्त करण्यात आली आहे. त्यांना मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा : मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याचा संशय; उत्तमनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला






