“अस्सल सातारी ‘माने बंधूंचा’ एक जबराट पिच्चर येतोय...”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तील ‘या’अभिनेत्यासाठी किरण मानेंची खास पोस्ट
‘मुलगी झाली हो’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ‘सिंधुताई माझी माई’ आणि ‘तिकळी’ सारख्या मालिकेतील अभिनयामुळे अभिनेता किरण माने महाराष्ट्रातल्या घराघरांत लोकप्रिय झाले. शिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमधूनही अभिनेता किरण माने आपल्या चाहत्यांमध्ये फेमस झाले. कायमच अभिनेता सोशल मीडियावर सामाजिक- राजकीय विषयांवर आपली स्पष्ट मतं मांडत असतात. मात्र, त्यांनी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ही पोस्ट किरण माने यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील एका अभिनेत्यासाठी लिहिली आहे.
मराठी इंडस्ट्रीमध्ये ‘माने बंधू’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या किरण माने यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता रोहित मानेसाठी खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. मराठमोळा अभिनेता रोहित माने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचला आणि लोकप्रिय झाला. खरंतर, या कार्यक्रमामुळेच रोहितचा मोठा चाहतावर्ग आहे. सातारकडच्या भाषेचा लहेजा आणि त्याचे गावरान विनोद या सगळ्याची सांगड घालत, त्याने आपल्या हटक्या स्टाईलच्या माध्यमातून रोहितने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेत. काल रोहित मानेचा वाढदिवस होता. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त मराठी अभिनेता किरण माने यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
“…रोह्या भेटल्या- भेटल्या म्हणला होता ना, “अहो किरणसर, चाहते सेल्फी काढायला येतात, तवा कुनीतरी एक प्रश्न हमखास इचारतं, किरण मानेंचे तुम्ही नातेवाईक का?” मी म्हणलं अरे मलाबी इचारत्यात. “रोहित माने तुमचा कोन?” मी सांगतो, “लहान भाऊ.” रोह्या म्हणाला “मी बी तेच सांगतो.” तिथंच आमची मैत्री झाली. लवकरच अस्सल सातारी ‘माने बंधूंचा’ एक भन्नाट, जबराट, नादखुळा पिच्चर येतोय. हास्यजत्रानं मराठीलाजी रत्नं दिली, त्यातल्या या अनमोल हिऱ्याला वाढदिवसाच्या लै लै लै मनापासून शुभेच्छा ! लब्यू भावा” अशी इन्स्टाग्राम पोस्ट अभिनेता किरण मानेने शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किरण मानेने रोहित मानेसाठी खास पोस्ट शेअर केली होती.
किरण मानेंनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव करत रोहितला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता या दोघांचा एकत्र चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, रोहित मानेच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याने, ‘विकून टाक’, ‘तुम्हीच माझे बाजीराव’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर रोहितचा ‘चिकी चिकी बुबुम बूम’ हा नावाचा चित्रपट २८ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.