‘मी मावशी झालेय! होऊ दे खर्च...’; १४ वर्षांनी आई झाली तेजस्विनी पंडितची बहीण, शेअर केली ‘येक नंबर’ गुडन्यूज
सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडीत सध्या तिच्या ‘येक नंबर’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आहे. तिने निर्मिती केलेला आणि अभिनय केलेला ‘येक नंबर’ चित्रपट १० ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. तिच्या ‘येक नंबर’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, इंडस्ट्रीतील कलाकारांचाही सिनेमाला प्रतिसाद मिळत आहे. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली असून तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.
तेजस्विनीची बहीण पौर्णिमा पुल्लन हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तब्बल १४ वर्षानंतर तेजस्विनीची बहीण पौर्णिमा आई झाली आहे. तर तेजस्विनी मावशी झाली आहे. ऐन दिवाळीच्याच मुहूर्तावर लक्ष्मी घरी आल्याचा आनंद तेजस्विनीच्या आणि तिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये, तेजस्विनी पंडीत म्हणते…
“माझ्यासाठीची सगळ्यात ‘मोठी’, सगळ्यात ‘खास’ आणि आयुष्यभराची ‘दिवाळी भेट’ माझ्या बहिणीने आणि दाजींनी मला दिली आहे. आमच्या घरात ‘लक्ष्मी’ आली! अनेक वर्ष ह्या सुखाचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्वच आसुसलेले होतो. माझ्या माणसांच्या आयुष्यातला १४ वर्षांचा अपत्य प्राप्तीसाठीचा वनवास यंदाच्या दिवाळीत संपला. त्या हॉस्पिटलच्या फेऱ्या, तिथली धावपळ, अचानक उद्भवलेले अडथळे या सगळ्यात आजूबाजूला सणाचे वातावरण आहे हे विसरायला झालं होतं पण या सगळ्यावर मात करत आमचे दिवाळीचे क्षण च नव्हे तर आयुष्य देखील या ‘कन्यारत्नाने’ उजळून टाकले! आमच्या कुटुंबाची “कथा” सुफळ संपूर्ण म्हणुया ? ही दिवाळी माझ्यासाठी एकदम खास आहे, मी मावशी झालेय! होऊ दे खर्च… तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा! शुभ दीपावली! शुभं भवतु”
तेजस्विनीने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतल्या कलाकारांनीही तिच्यावर आणि तिच्या बहिणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.