"अशी वागणूक मिळणार असेल तर..."; लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांना मिळणाऱ्या वागणूकीवर मराठमोळ्या अभिनेत्याचा संताप
गणेशोत्सवाच्या काळातील भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून लालबागचा राजा ओळखला जातो. या लालबागच्या राजाच्या चरणी दररोज कोट्यवधी भक्त दर्शन घेऊन जात असतात. सध्या लालबागचा राजा एका कारणामुळे चर्चेत आला, त्याचं कारण म्हणजे मंडपामध्ये भक्तांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक… फक्त सामान्य भक्तांनाच नाही तर, सेलिब्रिटींनाही लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये तेथील सुरक्षारक्षकांकडून अपमानास्पद वागणुक दिली जात आहे. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी फक्त मुंबईतूनच नाही तर, अख्ख्या देशभरातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्त येत असतात.
हे देखील पाहा – आई झाल्यानंतर दीपिका पादुकोण अभिनय सोडणार ? खास लेकीसाठी घेतला महत्वपूर्ण निर्णय
इतक्या दुरून येऊन, रांगेत तासंतास उभे राहूनही सामान्य नागरिकांना व्यवस्थित दर्शन दिले जात नाहीत. आणि सेलिब्रिटींना आपल्या कारमधून पटकन उतरून अवघ्या काही मिनिटांतच त्यांना बाप्पाच्या चरणी दर्शन मिळतं. हवा तितकं वेळ त्यांना बाप्पाची आराधनाही करायला मिळते. एकंदरीतच या सर्व गोष्टींवर आणखी एका मराठमोळ्या सेलिब्रिटीने संताप व्यक्त करत भाविकांना मिळणाऱ्या वागणूकीवर भाष्य केले आहे. अभिनेता आदिनाथ वैद्य ह्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदिनाथ म्हणतो, “नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलणार आहे, कदाचित ते वादग्रस्त असू शकतं. पण आता मी स्वतःला ते बोलण्यापासून थांबवू शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी जे काही पाहतोय ते सगळं खूप दु:खद आहे.”
“गणपतीसाठी आपण वेगवेगळ्या मंडळात जातो आपल्याला आकर्षण असतं. लहानपणापासून प्रत्येकालाच गणपतीचं विशेष आकर्षण असतं. तसं मलाही होतं. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाचं आकर्षण होतं. त्या ठिकाणी माझा सत्कारही झाला आहे. इथे तुम्ही दोन पद्धतीने जाऊ शकता. एकतर सामान्य नागरिकांची रांग आणि दुसरी म्हणजे व्हीआयपी लाईन. अर्थात त्या रांगेतून अनेक बडे सेलिब्रिटी आणि वेगवेगळे प्रसिद्ध लोकं जातात. खूप वर्षांपूर्वी मी स्वतः व्हीआयपी लाईनने गेलो होतो. मला त्या मंडळातर्फे आमंत्रण आलं होतं, म्हणून मी पाहुणा म्हणून मी गेलो होतो. त्यानंतर मी जे काही तिथे पाहिलं त्यानंतर मी स्वतःहून तिथे कधीच गेलो नाही. मला हे सगळ्यांना म्हणजे अगदी तेथील व्यवस्थापकांनाही सांगायचं आहे कि, हे सेलिब्रिटीज, हे रिलायन्स नक्की कोण आहे. यांना ही पदवी देतं कोण? यांना कोण त्या उंचीवर पोहोचवतं ? आपण रिलायन्सच्या वस्तू वापरतो म्हणून अंबानी आज त्या ठिकाणी आहेत. सेलिब्रिटीजचं सिनेमे जाऊन लोक बघतात म्हणून आज ते इतके प्रसिद्ध आहेत. त्यांना हे स्थान लोकांमुळे मिळालं आहे. जे लोक तुम्हाला हे स्थान देतात त्यांच्याशी तुम्ही इतकं वाईट कसं वागू शकता.”
“मला हे म्हणायचं आहे की, देवाच्या दारात अशा पद्धतीची वाईट वागणूक तुम्ही कशी देऊ शकता. म्हणजे हे बघायला खूप वाईट वाटतं की, लोकांच्या माना पकडून त्यांना पुढे ढकललं जातं. त्यांना किमान एक मिनिटही तिथं दर्शन घ्यायला मिळत नाही. काय आहे हे ? तिथलं व्यवस्थापन खूप चुकीचे आहे. तुम्ही त्यांना बोलून सांगू शकता की, तुमची जास्त वेळ झाली आहे, आता तुम्ही पुढे जा, याला व्यवस्थापन म्हणतात. समजू शकतो की, तिकडे खूप जास्त गर्दी असते. मग म्हणून तुम्ही कोणालाही असं वाईट पद्धतीने पकडून आणि त्यांच्यासोबत वाईट वागू शकत नाही, ही बाब फार वाईट आहे. सामान्य भक्तांना अशी विचित्र वागणूक आणि सेलिब्रिटींना अशी वेगळी वागणूक का ? इतर प्रोफेशनप्रमाणे अभिनय सुद्धा एक प्रोफेशन आहे. फक्त काही प्रोफेशन्समध्ये ग्लॅमर कमी असतं, फक्त इतकाच फरक आहे. कृपया, माझी लालबागचा राजा मंडळाच्या व्यवस्थापनाला एक विनंती आहे की, तुम्ही तिथे येणाऱ्या भक्तांना कशी वागणूक दिली जाते याकडे जरा लक्ष घालावं. पन्नास किलो सोनं तुम्हाला दान म्हणून मिळतं, पण तुम्ही भक्तांना जी वागणूक देता ती अतिशय वाईट आहे.”
“मला इतर लोकांनाही विचारायचं आहे की, लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलो त्याच्याकडे खूप सोनं आहे, चांदी आहे आणि मोठा गणपती आहे म्हणून आपली इच्छा पूर्ण होणार आहे का ? म्हणून देव आपली प्रार्थना ऐकणार आहे का ? तुम्ही तुमच्या घरातील छोट्या मूर्तीसमोरही तुमची व्यवस्थित मनापासून प्रार्थना करू शकता. तुम्हाला लालबागचा राजाला जाऊन स्वतःला वाईट वागणूक देण्याची गरज नाहीये. जर आपल्याला तिथे जाऊन अशी वागणूक मिळणार असेल तर तिथे जाऊ नका. मी हे सगळं माझ्या सगळ्या चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना सांगतो की, त्यांनी कृपया तिथे जाऊ नये. व्हीआयपी ट्रीटमेंट नाही पण किमान चांगली वागणूक तरी मिळेल अशी अपेक्षा मी करतोय. तिकडे ज्यांना त्रास झाला त्यांची मी खरंच माफी मागतो पण तुमच्या घरातील बाप्पाकडे तुम्हाला ते प्रेम मिळेल. लालबागचा राजा मंडळाने त्यांचं व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था बदलण्याची खरंच गरज आहे. लोकांना वाईट वागणूक देण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही.” असं स्पष्टपणे सांगत त्याने कानउघाडणी केली.