१९६४ या साली प्रदर्शित चित्रपट ‘सेंट मी नो फ्लॉवर्स’ हा अमेरिकन शृंगारिक कॉमेडी. जो तुफान गाजला. त्यावर नाटकही आलं. विषयाच्या वेगळेपणामुळे लक्षवेधी ठरलं. १९६७ या वर्षी मराठी रंगभूमीवर विक्रम बेडेकर लिखित-दिग्दर्शित ‘वाजे पाऊल आपुले’ हे नाटक आले.
जे त्याच चित्रपट-नाटकावर आधारित होतं. त्यात दाजी भाटवडेकर आणि पद्मा चव्हाण यांच्यासह ‘डॉक्टर’ होते सतीश दुभाषी. पुढे प्रदीप कबरे यांनी याच कथानकावर दोन नाटके आणली. एक ‘हाय दिल मेरा’ आणि ‘दिल धक धक करे!’ संजय मोने लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘सारखं छातीत दुखतय’ हे ही नाटक आले.
आणि आता २०२२ या वर्षात पुन्हा एकदा अभिराम भडकमकर यांचे ‘हसवा’ हा ‘सवता’ हे नाटक नव्या दमात रंगभूमीवर प्रगटलय. मूळ कथानकाचा गाभा तोच. गेली ६२ वर्षे एक कथानक अशा प्रकारे ठळकपणे सहावेळा प्रगटलय हा ही तसा विक्रमच!
कथानक एका दांपत्याभोवती गुंफण्यात आलय. मानव आणि गार्गी. सुखाने संसार करीत आहेत. मानवचा स्वभाव जरा संशय पण गार्गी बिनधास्त. या दोघात ‘आकाश’ नावाचा एक तरुण प्रगटतो. जो गार्गीचा कॉलेजदोस्त आहे. अशाप्रकारे या दांपत्यात तिसरा माणूस घुसतो. मानवला ब्रेनट्यूमर असल्यामुळे तो पत्नी गार्गीचा विवाह आकाशशी करण्याला अनुमती देतो. एक धक्का.
कलाटणी. फॅन्टसी इथूनच नाट्य अधिक विनोदाच्या वाटेवर पोहचते. आता नवऱ्यासमक्ष बायकोचं लग्न, संवाद, प्रेम, हनिमून हे देखिल सोपस्कार होतात. ‘दोन नवरे एक बायको!’ असा जगावेगळा खेळ रंगतो. त्यात पत्नी गार्गीला चक्क दिवस जातात एकेक धम्माल घटनांची वेगवान मालिका सुरू होते. जी हादरून-हसवून सोडते. ही ‘फॅन्टसी’ असल्याने अधिक विचार न करता बघणं भाग आहे. घराघरात पोहचलेल्या मालिकांतील बदलत्या नातेसंबंधांमुळे प्रेक्षकांनाही त्याचा आता सराव पुरेपूर झालाय!
मानवच्या भूमिकेत विनोदवीर प्रियदर्शन जाधव म्हणजे कळसच. उत्स्फूर्तता आणि सहजता याचे मिश्रण त्याच्या व्यक्तिरेखात आहे. हक्काचे ‘हसे’ वसूल करतो. त्याला चांगली साथसोबत अश्विनी जोशी (गार्गी) हिने दिलीय. काहीसा बायकी, घाबरट असलेला आकाश हा अमोल बावडेकर याने केलाय. नव्या पिढीचा गायक अभिनेता जरी असला तरी त्याला विनोदाची चांगली जाण आहे.
हे ‘त्रिकूट’ नाट्य रंगविण्यात यशस्वी ठरलय. सूत्रधार म्हणून प्रसाद दाणी (विष्णू) आणि श्रद्धा पोखरणकर (पार्वती) यांचीही हजेरी यात आहे. खरतर या पात्रनियोजनाची तशी आवश्यकता नव्हती. तरीही वेगळेपण दाखवण्यासाठी कदाचित ही जमवाजवी केली असावी. पण ती कुठेही तशी खटकत नाही. उलट त्यांची ‘आजची भाषा’ हसे वसूल करते.
दिवाणखाना आणि बेडरूम यात नाट्य घडतं आणि मागे स्लायडींगचा वापर करून अनेक प्रसंग हे दाखविले आहेत. ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल. पुरुषोत्तम बेर्डे यांचे संगीत ‘फॅन्टसी’ची रंगत वाढविते. अनेक निवडक गाणी आणि टायटल म्युझिक सुंदरच. आणि दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी पडद्यामागे ‘डबलरोल’ केलाय.
दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना त्यांची आहे. त्यांच्या नाट्य वाटचालीतले हे नाबाद पन्नासावे नाट्य आहे जे लक्षवेधी ठरलय. नाट्याचा वेग आणि त्यातील नेमकेपणा हा दिग्दर्शनात दिसून येतो. बरेच दिवसानंतर एका सशक्त विनोदी फॅन्टसीचं आगमन व्यावसायिक रंगभूमीवर झालय. जे फुल्ल टाईमपास मनोरंजन निश्चितच करेल, यात शंका नाही.
दोन वर्षाच्या मध्यंतरानंतर विनोदी नाटकांची आज रंगमंचावर एकच भाऊगर्दी झाली आहे. गंभीर आशयाची नाटके गंभीरपणे बघण्यापेक्षा तणावमुक्ती करणाऱ्या मनोरंजनात्मक नाटकांकडे बुकींगवर रसिकांचा ओढा दिसतो. या पार्श्वभूमीवर हे नाटक जोरदार बाजी मारते. आजवर कुटुंबात ‘सवत’ असते हे एकवेळ जरी मान्य केलं जाईल पण इथे ‘सवता’चं नातं जन्माला आलंय.
नाटकाच्या शीर्षकापासूनच ‘हसतं’ ठेवण्याचा प्रयत्न केलाय. त्यात कुठेही खंड नाही.
-दोन नवऱ्यांची एका बायकोसोबतची फट्फजिती ही ‘फॅन्टसी’ शैलीत मस्त आकाराला येतेय.
संजय डहाळे
sanjaydahale33@gmail.com
हसता हा सवता
लेखक – अभिराम भडकमकर
दिग्दर्शक / प्रकाश – कुमार सोहोनी
नेपथ्य – बाबा पार्सेकर
संगीत – पुरुषोत्तम बेर्डे
सूत्रधार – भैरवनाथ शेरखाने
निर्मिती – मोरया / स्मितहरी / वेदांत