हिंदीप्रमाणे त्यांनी मराठी सिनेमात देखील आपली छाप पाडली होती. त्यांचे मराठीतील दोन गाजलेले सिनेमे म्हणजे ‘गंमत जंमत’ आणि ‘वाजवा रे वाजवा’. या दोन्ही सिनेमात सतीश शाह झळकले होते. त्यांची भूमिका अत्य़ंत छोटी होती मात्र याचा प्रभाव आजही प्रेक्षकांच्य़ा मनावर आहे. विनोदाचा टायमिंग उत्तम असणाऱ्या या अभिनेत्याने ‘वाजवा रे वाजवा’ या सिनेमात चक्क खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि नसत्या अहंकारापोटी बाबुराल जैन आपल्य़ा पोटच्या मुलींच्या सुखाला पायदळी तुडवायला देखील मागेपुढे पाहत नाही. एक प्रतिष्ठीत उद्योजक पण माणूस म्हणून अत्यंत वाईट, स्वत:च्य़ा स्वार्थासाठी मैत्रीत विश्वासघात करणारा अशी बाबुराल जैनची भूमिका सतीश शहांनी साकारली होती. या सिनेमात अशोक सराफ, प्रशांत दामले, किशोरी शहाणे, अजिंक्य देव, निशिगंधा वाड अशी मातब्बर कलाकरांची टीम होती. 1993 मध्ये आलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो.
याचबरोबर मराठीतील आणखी असाच एक गाजलेला सिनेमा ज्याच्या शिवाय विनोदी सिनेमाची लीस्ट पूर्ण होऊच शकत नाही तो म्हणजे ‘गंमत जंमत’. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावर यांच्या या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पदड्यावर मुख्य नायिका म्हणून वर्षा उसगावकर यांचं पदार्पण मनोरंजन सृष्टीत झालं. गंमत जंमत सिनेमात देखील सतीश शहा यांनी विनोदी पोलिसाची भूमिका साकारली होती. या सिनेमात इन्स्पेक्टर फुटाणे असं त्यांच्या भूमिकेचं नाव होतं. या सिनेमातही त्यांची भूमिका छोटीच होती पण त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं, असा हा विनोदवीर ज्याची फक्त हिंदीशीच नाही तर मराठी सिनेसृष्टीशी देखील तितकीच नाळ जोडली होती.






