(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बहुप्रतिक्षित देऊळ बंद २ या चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेची प्रचंड लाट उसळली आहे. काही दिवसांपूर्वीच २१ मे २०२६ ही प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता समोर आलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाबाबतची चर्चा आणखी रंगली आहे. “आता परीक्षा देवाची” ही टॅगलाईन प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिकाच उभी करते—या वेळी स्वामींची परीक्षा कोण घेणार? की भक्तांची श्रद्धा कसोटीवर लागणार?
चित्रपटाच्या पहिल्या भागात स्वामींनी परदेशातून आलेल्या शास्त्रज्ञाच्या आलिशान चारचाकीतून प्रवास केला होता तर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात म्हणजेच देऊळ बंद २ मध्ये स्वामी एका गरीब महिलेच्या सामान्य दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत.
देऊळ बंद २ आता परिक्षा देवाची च्या पहिल्या पोस्टरमध्ये प्रसन्न मुद्रेनं हा उंचावत स्वामी दुचाकीवर बसले असून स्नेहल तरडे ती दुचाकी चालवत आहे.पोस्टरमध्ये स्वामी प्रसन्न मुद्रेत दिसत असले तरी स्नेहल यांच्या चेहऱ्यावर राग आणि डोळ्यांत अश्रू दिसतात. त्यामुळे हा राग नेमका कशासाठी आहे आणि त्या दुःखी का आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. याची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.“भक्त कितीही संकटात असला तरी स्वामी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात,” हा भावनिक आणि श्रद्धेचा संदेश या पोस्टरमधून स्पष्टपणे मांडला गेला आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
“एक चूक अन्…” Akshay Kumar चे अपघाताचे थरारक अनुभव, शुटिंग दरम्यान 3 वेळा मृत्यूच्या उंबरठ्यावरुन…
दरम्यान, निर्माता प्रवीण तरडेची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडेची प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री स्नेहल म्हणाली, ‘सद्गुरू स्वामी समर्थांची परीक्षा घेणारी व्यक्ती या जगात जन्माला आलेली नाही. हे धाडस एक मायमाउलीच करू शकते. स्वतःच्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी अहोरात्र झटते आहे, कष्ट करते आहे. आणि म्हणूनच गुरुमाउली स्वामी समर्थदेखील ‘देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची’ या सिनेमात हसत-हसत या मायमाउलीच्या परीक्षेला सामोरं जाणार आहेत. चित्रपटात प्रेक्षकांना श्रद्धा आणि वास्तव यांचा एक वेगळाच संगम अनुभवायला मिळेल.”
“देऊळ बंद” या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. श्रद्धा, अध्यात्म, संघर्ष आणि समाजातील वास्तव यांचा संगम असलेला हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल, अशी चिन्हे दिसत आहेत. एकूणच, “देऊळ बंद २” च्या पोस्टरनेच चित्रपटाची ताकद दाखवून दिली आहे. आता २१ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘देऊळ बंद 2’ ची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अष्टपैलू कलाकार प्रविण विठ्ठल तरडे यांचं असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे






