फोटो सौजन्य - Social Media
स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेने पहिल्याच दिवशी ४.५ टीव्हीआर मिळवत टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी ६.३० वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी मालिका म्हणून विक्रम केला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांवरील श्रद्धा आणि त्यांचा महिमा मांडणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
हे देखील वाचा : विनीत कुमार झळकणार सनी देओलसह मोठ्या पडद्यावर, ‘जाट’ चित्रपटाचे पोस्टर झाले रिलीज!
या महामालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘साडे तीन शक्तिपीठे आपली श्रद्धास्थानं आहेत. ही फक्त देवी नसून आपल्या साऱ्यांची आई आहे. ही गोष्ट सादर करताना कृतज्ञता जाणवतेय. पहिल्या भागापासून मिळणारे प्रेक्षकांचे प्रेम अतिशय अविस्मरणीय आहे. मोठी जबाबदारी आहे. तिन्हीसांजेला देवी आई घरात येऊन संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देत आहे. या मालिकेच्या उद्देश घरबसल्या लोकांना शक्तिपीठांची यात्रा घडवणे तसेच त्याबद्दल माहिती पुरवणे आहे. आपली परंपरा जोपासण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा नेहमीच प्रयत्न असते. ही मालिकाही अशीच संस्कार मूल्य आणि करमणुकीची सांगड बांधून सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी भावना सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली.’
या मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे भगवान शिवशंकराची भूमिका साकारत असून, त्याने मालिकेच्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणाला कि, “देवीच्या आशीर्वादामुळेच हा इतिहास घडवू शकलो. मालिकेला भरभरुन प्रेम दिल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राचे आभार. टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. टीव्ही हे प्रेक्षकांच्या मनात पोहचण्याचे माध्यम आहे. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे.”
हे देखील वाचा :कोण आहे करोलिना गोस्वामी? ध्रुव राठीच्या चाहत्यांनी फटकारल्यानंतरही परतली भारतात!
मालिकेत आदिशक्तीची विविध रूपे अभिनेत्री मयुरी कापडणे साकारत असून, ती माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची अंबाबाई, तुळजापुरची भवानी आणि वणीची सप्तशृंगी अशा देवींच्या भूमिका करणार आहे. मयुरीने देवीच्या आशीर्वादामुळे ही संधी मिळाल्याचे सांगितले आणि पौराणिक मालिकेत काम करण्याचा अनुभव खूप खास असल्याचे व्यक्त केले. लवकरच माहुरच्या रेणुकामातेचा अवतार मालिकेत पाहायला मिळणार आहे.