मराठी अभिनेते प्रवीण तरडेंची आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये एंट्री : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे आता दक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकणार आहेत. मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रवीण तरडे आता विक्रमार्का या सिनेमामध्ये महत्वाच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करीत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
‘अहो विक्रमार्का’ या सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका
‘अहो विक्रमार्का’ या सिनेमात मुख्य खलनायकाची भूमिका ते साकारणार आहेत . सिनेमातील त्यांचा लुक नुकताच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. लांब केस आणि दाढी, गळ्यात असुराचं चिन्ह, अंगावर ओढलेल कांबळ या भन्नाट लूकमधून प्रवीण तरडे चात्यांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्यासह तेजस्विनी पंडित, सयाजी शिंदे, चित्रा शुक्ला असे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.
फॅन्सच्या नव्या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा
चित्रपटातील पहिला लूक शेयर केल्यांनतर चाहत्यांनी “आरारा खतरनाक”, “जय शिवराय सर”, “हार्दिक अभिनंदन सर”, “आता सर दाक्षिणात्य इंडस्ट्री गाजवा” अशा कमेंट्स करीत प्रवीण तरडेंना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. हा सिनेमा तेलगूबरोबर मराठी, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मुळशी पॅटर्न तुफान गाजला
२०१८ साली प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुफान गाजला. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटात उद्योगांसाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्यांची विदारक कहाणी मांडण्यात आली होती.
प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
मुळशी पॅटर्न चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाची कथा, संवाद, गाणी, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना आवडलं. त्यामुळे आता प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा केल्याने या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत. मुळशी पॅटर्न 2 कधी प्रदर्शित होईल हेही लवकरच समोर येईल.