प्रेक्षकांचा आवडता सांगीतिक कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ (Sur Nava Dhyas Nava) कलर्स मराठीवर (Colors Marathi) पुन्हा सुरु होणार आहे. आपण म्हणतो ना जुनं ते सोनं असतं, पण… नवंही हवं असतं. ‘सूर नवा ध्यास नवा’ या मंचावर आपण सगळ्यांनी अनेक प्रसिद्ध गाणी ऐकली. पण आता मात्र या गाण्यांना आजची तरुण पिढी एका नव्या ढंगात, नव्या रुपात सादर करणार आहेत.
स्पृहा जोशीच्या जागी रसिका सुनील
आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले महेश काळे तसेच हरहुन्नरी अदाकार अवधूत गुप्ते कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री रसिका सुनील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. याआधीच्या पर्वांचं सूत्रसंचालन स्पृहा जोशीने केलं होतं. मात्र स्पृहाची जागा आता रसिकाने घेतली आहे. येत्या 7 ऑक्टोबरपासून शनि – रवि रात्री 9. 00 वा. कलर्स मराठीवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
प्रत्येक गाण्याला नाविन्याची किनार
सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण पर्वात जुनी गाणी नव्या रुपात सजणार आहेत. प्रत्येक गाण्याला नाविन्याची किनार असणार आहे.तरुण पिढीकडे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांच्यात एक जिद्द असते, एक प्रकारची वेगळी ऊर्जा असते काहीतरी वेगळं करून दाखविण्याची. कार्यक्रमाच्या ऑडिशनला महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यातून निवडलेल्या 12 सूरवीरांमध्ये रंगणार आहे सामना. महाविजेता कोण ठरणार आणि कोणाला मिळणार मानाची कट्यार हे कळेलच.
यानिमित्ताने बोलताना कलर्स मराठीचे (वायकॉम18) बिझनेस हेड अनिकेत जोशी म्हणाले, ‘सूर नवा…’ च्या मागील पर्वांचा प्रवास बघितला तर लक्षात येईल या कार्यक्रमाने नेहमीच नवनवीन प्रयोग केले आहेत. मग ती पर्वाची थीम असो वा काही विशेष भाग असो. प्रेक्षकांना या वैविध्यतेने कार्यक्रमाशी बांधून ठेवले. इतकेच नव्हे तर नवा प्रेक्षक कार्यक्रमाशी जोडत गेला ज्याचं फायदा वाहिनीला देखील झाला आहे. या पर्वात आजची तरुण पिढी जुन्या सुप्रसिध्द मराठी गाण्यांचं रिप्राइज्ड version घेऊन आपल्या भेटीस येणार आहेत. हे स्पर्धकांसमोर खूप मोठं आव्हान असणार आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना कलर्स मराठीचे, (वायकॉम18) प्रोग्रामिंग हेड विराज राजे म्हणाले, ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचा गेल्या सहा वर्षांत त्याचा असा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. ज्यांना संगीताची गोडी आहे, उत्तम जाण आहे असे रसिक प्रेक्षक या कार्यक्रमास जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नवं पर्व आणताना खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो कारण कुठेतरी आम्ही त्याच्या अपेक्षांना बांधील आहोत.
या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांची लाडकी रसिका सुनील करणार आहे, यानिमित्ताने बोलताना ती म्हणाली, “मी खूपच उत्सुक आहे की, यावर्षी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. कारण, माझ्यासोबतच आमच्या घरातील सगळे हा कार्यक्रम आवर्जून बघतो. सूर नवा ध्यास नवा वेगळ्या ढंगात प्रेक्षकांच्या समोर येणार आहे त्यामुळे सूत्रसंचालन करण्यासाठी एक वेगळीच उत्सुकता आहे. यासाठी काही विशेष तयारी केली नाहीये, मी जशी आहे तशीच तुम्हां सगळ्यांसमोर येणार आहे. तेव्हा मला खात्री आहे तुमचं प्रेम मला पहिल्यासारखंच मिळेल”.